चारूशीला कुलकर्णी

नाशिक : करोना संसर्गातून बरे झालेल्या काही रुग्णांना घरी आल्यावर तसेच काहींना करोना काळात दीर्घ कालावधीसाठी रुग्णालयात उपचारासाठी असतांना ‘म्युकरोमायकोसिस’ या नवीन आजाराचा त्रास होत आहे. शासनाने या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या पाहता महात्मा फुले आरोग्य योजनेत आजार समाविष्ट केला असला तरी या योजनेपासून लाभार्थी वंचित राहत आहेत.

करोना संसर्ग नियंत्रणात राहण्यासाठी रेमडेसिविर, क्युराईडसह अन्य औषधांचा मारा रुग्णांवर होत आहे. यामुळे करोना उपचारानंतर किंवा उपचार सुरू असतांना रुग्णांना वेगवेगळ्या व्याधींना तोंड द्यावे लागत आहे. यामध्ये प्रथमदर्शनी डोळे दुखणे, डोके दुखणे तसेच दिसायला कमी होणे, असा त्रास होत आहे. हा त्रास नियंत्रणाबाहेर गेल्यावर डोळा निकामी होण्याची शक्यता असते.

या आजाराने त्रस्त असलेले रुग्ण आपली ओळख लपवित असून बुरशीजन्य आजार असल्याने रुग्णांना इतरांकडून तिरस्कार सहन करावा लागत आहे. परिणामी, काही कुटूंबात तर रुग्णालावाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे. म्युकरोमायकोसिसचा समावेश महात्मा फुले आरोग्य योजनेत करण्याची घोषणा होण्यापूर्वीच काहींनी खासगी रुग्णालयात उपचार सुरू केल्याने या योजनेपासून ते वंचित राहिले आहेत.  काहींना या आजारावर होणारा खर्च आर्थिक क्षमतेच्या बाहेर जात असल्याने मदतीसाठी वणवण करावी लागत आहे.

अल्पभूधारक असून घरातील एकटी कमावती व्यक्ती आहे. मागील महिन्यात करोना आजारातून बरे झाल्यावर त्यास नवा त्रास सुरू झाला. तातडीने खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले. खर्च अपेक्षेपेक्षा जास्त झाला. आजारपणात इतका खर्च झाल्यानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या कशा पूर्ण करणार, असा प्रश्न एका रुग्णासमोर आहे. एका रुग्णाने तर हा आजार झाल्यावर आईनेही बोलणे सोडून दिल्याचे दु:ख व्यक्त के ले.

म्युकरमायकोसिसचे रुग्ण जिल्ह्य़ात आढळण्यास सुरूवात झाली आहे. या आजाारवरील उपचाराचा खर्च परवडण्यासारखा नाही. आरोग्य मंत्र्यांनी उपचारात आवश्यक असलेले एम्फोटेरेसिन बी इंजेक्शन खरेदी करुन रुग्णाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे. इंजेक्शनची खरेदी वरिष्ठ स्तरावरून होत आहे. हे इंजेक्शन उपलब्ध झाल्यावर रुग्णांना दिले जाईल. यामुळे रुग्णांचा आर्थिक भार कमी होईल. मात्र हा आजार टाळण्यासाठी  शासनाच्या निकषानुसार करोनाग्रस्तांवर उपचार केले तर या आजारातील गुंतागुंत कमी होईल. तसेच आजाराविषयी प्रबोधन सुरू आहे.

– डॉ. अशोक थोरात (जिल्हा शल्यचिकित्सक)