भाजपचेही मुख्यमंत्र्यांना साकडे
मराठवाडय़ाला पाणी देण्याच्या मुद्दय़ावरून स्थानिक पातळीवर भाजप विरुद्ध सर्वपक्षीय या वादाने शनिवारी वेगळे वळण घेतले. महापालिकेच्या विशेष सभेत या निर्णयाला भाजपला जबाबदार ठरवत सर्वपक्षीयांनी नाशिकच्या हक्काचे पाणी पुन्हा सोडण्याची वेळ येऊ नये म्हणून न्यायालयात फेरयाचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे नाशिकवर अन्याय झाल्याची तक्रार करत मराठवाडय़ात त्याचा पिण्यासाठी वापर होतो की नाही, यावर देखरेख करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी केली.
जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आल्यामुळे मित्रपक्ष शिवसेनेसह विरोधकांनी आंदोलनाचे सत्र राबविल्यानंतर सत्ताधारी भाजपचे आमदार जागे झाले. सर्वपक्षीय कृती समितीच्या आंदोलनावर टीकास्त्र सोडत या प्रश्नात नाशिककरांची बाजू मांडण्यासाठी शनिवारी आ. सीमा हिरे व आ. बाळासाहेब सानप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. समन्यायी पाणीवाटपाचा विषय महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अखत्यारीत आहे. प्राधिकरणाला वैज्ञानिक अधिकार देताना काही त्रुटी राहिल्याने नाशिकवर पाणी सोडण्याची वेळ आली. कुंभमेळा देशाचा महोत्सव असूनही कुंभमेळ्यात धरणातून सोडलेले पाणी नाशिकच्या हिशेबात समाविष्ट केले गेले. गंगापूरच्या सहा पट अधिक जलसाठा जायकवाडीत असताना नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडणे अन्यायकारक असल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. पुढील काळात नाशिकवर असा अन्याय होऊ नये, यासाठी समन्यायी पाणीवाटपासंबंधीच्या निकषांत फेरबदल करावा, अशी मागणी करण्यात आली. या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आ. हिरे यांनी सांगितले. या वेळी सर्वपक्षीय कृती समिती वा अन्य पक्षांचे कोणी पदाधिकारी उपस्थित नव्हते.
नाशिकच्या पाणी प्रश्नावर महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा याच दिवशी पार पडली. नाशिकवर ओढावलेली स्थिती शासनाकडे मांडण्यास भाजपचे लोकप्रतिनिधी कमी पडले. राज्याचे जलसंपदामंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील आमदारांना विश्वासात घेतले नाही, अशी आगपाखड मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली. या घडामोडींमुळे भाजप नगरसेवकांची कोंडी झाली. या प्रश्नावर बरीच चर्चा झाल्यानंतर नाशिकच्या हक्काचे पाणी दर वर्षी या प्रकारे सोडण्याची वेळ येऊ नये म्हणून जलतज्ज्ञांचा सल्ला घेऊन न्यायालयात फेरयाचिका दाखल करण्यात येणार असल्याचे महापौर अशोक मुर्तडक यांनी सांगितले. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाशिकच्या पाणी प्रश्नाबाबत निवेदन देताना आ. सीमा हिरे व बाळासाहेब सानप.