बंधाऱ्यात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले
दिंडोरीच्या आंबेगण शिवारातील बंधाऱ्यात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताने प्रेमसंबंधाच्या कारणास्तव कौटुंबिक वाद निर्माण झाल्यामुळे तिला लोखंडी गजाने बेदम मारहाण करून ठार केले. मृतदेह गोणीत बांधून फेकून दिल्याची कबुली दिली आहे. संशयिताला मोटारीतून मृतदेह नेण्यास मदत करणाऱ्या मित्राचा पोलीस शोध घेत आहेत.
दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २७ नोव्हेंबर २०१७ रोजी बंधाऱ्यात अनोळखी युवतीचा मृतदेह आढळून आला होता. चेहरा विद्रूप करून संशयिताने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह हातपाय बांधून झोळीत दगड टाकून बंधाऱ्यातील पाण्यात टाकून दिल्याचे निदर्शनास आले होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक करपे यांनी घटनास्थळाची पाहणी करून मयत युवतीने परिधान केलेले कपडे, वस्तूंचे परीक्षण करून विशेष पथकाला तपासाबाबत सूचना केल्या.
२० नोव्हेंबर २०१७ रोजी सोनालीला संशयिताने लोखंडी गजाने मारहाण केली. नंतर मृतदेह मित्राच्या मोटारीतून आंबेगण शिवारात नेला. गोणीत दगड भरून मृतदेह हातपाय बांधून बंधाऱ्यात फेकला. या प्रकरणातील मुख्य संशयिताला दिंडोरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.
त्याला अटक करावयाची असल्याने संशयिताचे नाव उघड केले नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
या प्रकरणाचा कौशल्यपूर्वक तपास केल्याबद्दल पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी तपास पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
जिन्स पॅन्टवरील पट्टय़ावरून तपासाला गती
विशेष पोलीस दलातील उपनिरीक्षक नितीन पाटील आणि दत्ता हांडगे, चेतन मोरे, राजेश काकड, प्रशांत काकड यांच्या पथकाने घटनास्थळावरून मिळालेल्या युवतीच्या जिन्स पॅन्टवरील पट्टय़ावर मविप्र शिक्षण संस्थेचे चिन्ह आढळले. त्या अनुषंगाने तपास करून प्रथम तिची ओळख पटविली गेली. जिन्स पॅन्टवरील पट्टय़ावरील उल्लखावरून माहिती घेण्यास सुरुवात केली. मविप्र शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणांहून कोणी मुलगी बेपत्ता आहे काय, याची छाननी केली. तेव्हा मखमलाबादची एक मुलगी दीड ते दोन महिन्यांपासून गावात दिसून येत नसल्याची माहिती मिळाली. कुटुंबीयांकडे चौकशी केली असता मयत मुलगी ही सोनाली गंगानाथ झा असल्याचे स्पष्ट झाले. ओळख पटल्यानंतर मुलीचे कोणाशी प्रेमसंबंध होते काय, या दिशेने तपास करण्यात आला. मखमलाबाद गावातील एका व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. युवतीशी प्रेमसंबंधामुळे संशयिताच्या घरात अनेकदा वाद झाले होते. प्रियकराला ताब्यात घेतल्यानंतर त्याने प्रेमसंबंधामुळे घरात होणाऱ्या वादामुळे तिची हत्या केल्याची कबुली दिली.