नंदुरबार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतरही नंदुरबार जिल्ह्यातील केलखाडी येथे साकव बांधण्याची प्रक्रिया सुरु झालेली नसताना अक्कलकुवा तालुक्यातील डाब ग्रामपंचायतीतंर्गत येणाऱ्या मालीआंबा येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कराव्या लागणाऱ्या धोकादायक प्रवासाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
जिल्ह्यात प्रशासन एकीकडे साकवसाठी पैसे नसल्याचे आणि तांत्रीक अडचणींचे रडगाणे गात असताना मालीआंबाच्या ग्रामस्थांनी गावाजवळून वाहणाऱ्या वरखडी नदीवर पारंपरिक पद्धतीने बांबुचा झुलता पूल तयार करत प्रशासनाला चपराक दिली आहे. या पुलावरुन प्रवास करुनही मालीआंबाच्या विद्यार्थ्यांना शाळा गाठण्यासाठी पुढे अजून एका ठिकाणी नदीपात्रातून धोकादायक प्रवास करणे भाग पडते. झोपेचे सोंग घेतलेल्या शासन, प्रशासनाला विद्यार्थ्यांचा जीव गेल्यावर जाग येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात रस्ते आणि पुलाअभावी ७० गावे आणि ३७० पेक्षा अधिक पाड्यातील रहिवाशांना पावसाळ्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शिक्षण, आरोग्य आणि रोजच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी रस्त्यांअभावी अनेक ठिकाणी आदिवासी बांधवांना पावसाळ्यात थेट नदी, नाल्यांमधून धोकादायक प्रवास करावा लागतो. अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी येथे शाळा गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना झाडावरुन कराव्या लागणारा प्रवास उजेडात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची दखल घेतली. दुसऱ्या दिवशी बांधकाम विभागासह सर्वच पथके केलखाडीत दाखल झाली. त्यानंतर आजही त्या ठिकाणच्या परिस्थितीत कोणताच फरक पडलेला नाही.
हे उदाहरण ताजे असतानाच आता पुन्हा अक्कलकुवा तालुक्यातील डाबच्या मालीआंबा पाड्यातील विद्यार्थ्यांचा असाच शाळेपर्यतचा जीवघेणा प्रवास समोर आला आहे. या मालीआंबाच्या तीन पाड्यातील ३९ विद्यार्थी आणि शंभरहून अधिक बालकांना अंगणवाडी गाठण्यासाठी धोकादायक प्रवास करावा लागतो.
शासन, प्रशासनाकडे अनेक वेळा मागणी करुनही कार्यवाही होत नसल्याने गावकऱ्यांनी तीन ते चार ठिकाणी प्रत्येकी दोन हजार रुपये खर्चुन बांबुचा आणि दोरीच्या सहाय्याने वरखेडी नदीवर झुलता पूल तयार केला आहे. यावरुन विद्यार्थ्यांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. इतके करुनही शाळेजवळच या विद्यार्थ्यांना वरखेडी नदीत उतरावेच लागते. कमरेइतक्या पाण्यातून त्यांना पुढे जाणे भाग पडते. प्रशासनाकडून त्यांच्या या धोकादायक प्रवासाकडे दुर्लक्ष केले जात आहे. या मालीआंबाच्या शाळेला दोन ते तीन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांनीदेखील भेट दिली होती.
पावसाळ्यात या भागात अनेक समस्या निर्माण होतात. दरवर्षी बांबुच्या सहाय्याने पूल तयार केला जातो. मोठा पूर आल्यावर बाबुंचा पूलही वाहून जातो. पुन्हा नव्याने पूल तयार करतो. निवडणूक आली की भक्कम पूल तयार करुन देण्याचे आश्वासन दिले जाते. निवडणूक झाली की नेते, पुढारी फिरकतही नाहीत. – फुलवंती तडवी (ग्रामस्थ, मालीआंबा, अक्कलकुवा, नंदुरबार)