अभियंता दिनानिमित्त ‘इन्स्टिटय़ुशन ऑफ इंजिनिअर्स’ चे पुरस्कार जाहीर

दी इन्स्टिटय़ुट ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) स्थानिक केंद्राच्या वतीने अभियंता दिनाचे औचित्य साधत शनिवारी सायंकाळी पाच वाजता ४८ वा पुरस्कार वितरण सोहळा आणि अभियांत्रिकीच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात १५ अभियंत्यांना सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जाणारा पुरस्कार नाशिक येथील ऋषभ इन्स्ट्रमेंटचे नरेंद्र गोलिया यांना जाहीर झाला.

नाशिक केंद्राचे अध्यक्ष नरेंद्र बिरार यांनी ही माहिती दिली. यंदा अभियंता दिनानिमित्त ‘ज्ञानयुगातील अभियांत्रिकी आव्हाने’ ही संकल्पना देण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहात कार्यक्रम होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे समूह अध्यक्ष एस. दुर्गाशंकर तसेच एमएसईडीसीएलचे संचालक पी. यु. शिंदे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. अभियंत्यांना देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारासाठी एकूण ४७ प्रस्ताव आले होते. त्यातील १५ जणांची निवड करण्यात आली.

‘इंजिनिअरींग अचिव्हमेंट’ पुरस्कार मातोश्री कॉलेज ऑफ इंजिनिअर्स अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्या डॉ. नीता देशपांडे आणि के. व्ही. नाईक एस. पी. संस्था संचलीत तंत्रनिकेतचने प्राचार्य धनंजय बंगल, नाशिक महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रशांत मगर, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राच्या सहस्त्ररश्मी पुंड, बॉश कंपनीचे समीर जोशी, राज टेक्नॉलॉजीचे स्वप्नील देशमुख यांना जाहीर झाला. उदयोन्मुख उत्कृष्ठ अभियंता पुरस्कार इल्युम सोल्युशन इन्सचे स्वप्नील बोरा, नाशिक मेटल डस्टचे मयूर मुंद्रा, प्रेम कन्सल्टंटचे प्रसाद जैन, चांदवड येथील जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक संतोष संचेती, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे पराग देवरे यांना जाहीर झाला. महिला गटात बॉशच्या पल्लवी दयाल, सोनम मेहत्रा, अ‍ॅडव्हेंट इंजिनिअर्सच्या प्रेमलता मिश्रा यांची निवड करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संस्थेतर्फे ‘ज्ञानयुगातील अभियांत्रिकी आव्हाने’ विषयावर आयोजित निबंध स्पर्धेत बॉशच्या पल्लवी दयाल, क. का. वाघ महिला तंत्रनिकेतनच्या एस. व्ही. जोशी, बॉशच्या रोहिणी जोशी विजेत्या ठरल्या. त्यांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी निवड समिती सदस्य एम. एस. प्रभावले, सहसचिव आशिष कटारिया, विपुल मेहता, अपूर्वा जाखडी आदी उपस्थित होते. सोहळ्यास अभियंते, वास्तुविशारद, बांधकाम व्यवसायिक आदींनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.