‘आर्ट ऑफ लिव्हिंग’तर्फे ११ ते १३ मार्च रोजी भव्य कार्यक्रम
वैश्विक परंपरांचा अनोखा संगम साधण्याच्या उद्देशाने आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे दिल्ली येथे ११ ते १३ मार्च या कालावधीत आयोजित भव्य सांस्कृतिक महोत्सवात नाशिकचे २०० कलावंत सहभागी होऊन आपली कला सादर करणार आहेत. भरतनाटय़म्, कथ्थक, गरबा, बल्गेरियन व जपानचे नृत्य यापासून ते जगातील सर्वात मोठे वाद्य म्हणून ओळखले जाणारे नादस्वरम् हे धातूचे नसलेले वाद्य, धनगरी ढोल, भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित ४० विविध वाद्यांचे एकाच वेळी वादन असा अनोखा संगम या माध्यमातून साधला जाणार आहे.
या महोत्सवाची भव्यता नियोजनावरून लक्षात येते. एक हजार एकर जागेत साजरा होणाऱ्या या सोहळ्यात १५५ देशातील लाखो नागरिक सहभागी होणार आहेत. सोहळ्याचे व्यासपीठ सात एकर जागेत पसरलेले आहे. श्री रवीशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनने जगातील सुमारे चार कोटी लोकांना आपसात जोडून जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रेरणा देण्याचे काम केले आहे.
या कार्याला ३५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात नाशिकच्या बालकलाकारांपासून ते ज्येष्ठांपर्यंतचा समावेश राहणार आहे. त्यात बारा वर्षीय श्लोक व समर्थ कुटे बासरीवादन, आश्लेषा ढाकळे बासरी तर तिची आई सितार, जयश्री व्हायोलिन, मीनल पेटी, ६५ वर्षीय शशिकांत मजुमदार हे पेटीवादन करणार असल्याची माहिती सुरेश मालपुरे यांनी दिली.
जगभरातून ३५ हजार कलाकार
महोत्सवात जगभरातील ३५ हजार कलाकार सहभागी होऊन आपली कला सादर करणार आहेत. त्यात ८ हजार ५०० वादक ४० प्रकारच्या वेगवेगळ्या वाद्यांवर शास्त्रीय संगीत रचना सादर करतील. दक्षिण अफ्रिकेतील ६५० ड्रमवादक आणि भारतातील महाराष्ट्र, छत्तीसगड, सिक्कीम राज्यातील आदिवासी बांधव आपली कला सादर करतील. राज्यातील लोकप्रिय धनगरी ढोलचा निनाद दिल्लीत घुमणार आहे. त्यासाठी एक हजार ढोलवादकांची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. एकाचवेळी ४० प्रकारच्या वाद्यांचे वादन होणारा हा पहिला महोत्सव ठरावा. या निमित्ताने आदिवासी कलाप्रकारांना पुनरुज्जीवन मिळणार असल्याचे संयोजकांनी म्हटले आहे.