नाशिक : रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने देण्यात येणाऱ्या नाशिक भूषण पुरस्कारासाठी यंदा मराठा विद्या प्रसारक समाज (मविप्र) शिक्षण संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांची निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.या पुरस्काराची घोषणा रोटरी क्लबच्या अध्यक्ष डॉ. श्रीया कुलकर्णी, सचिव मंगेश अपशंकर, जनसंपर्क संचालक सुधीर जोशी आदींनी पत्रकार परिषदेत केली.
गौरवपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ११ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नाशिक भूषण पुरस्कार सोहळा समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र नेहेते यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने ही निवड केली.
रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे दरवर्षी सहकार, शिक्षण, प्रशासन, सामाजिक, साहित्यिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून नाशिकच्या लौकिकात भर घालणाऱ्या व्यक्तीला नाशिक भूषण पुरस्काराने सन्मानित केले जाते. या वेळी शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या नीलिमाताईंची निवड करण्यात आल्याचे क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मविप्र शिक्षण संस्था ही राज्यातील मोठय़ा शिक्षण संस्थांपैकी एक म्हणून ओळखली जाते. शहरापासून ग्रामीण भागात कानाकोपऱ्यापर्यंत शिक्षण संस्थेचा विस्तार झाला आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड उपस्थित राहतील. रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे ग्रामीण भागात गरजूंना प्रशिक्षण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कौशल्य प्रशिक्षण आदी उपक्रम राबविले जात असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
कार्याची दखल
नीलिमाताईंच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या शाखा ४५० वर पोहोचून दोन लाख विद्यार्थी संख्या गाठली गेली. त्यांच्या कार्याची दखल या पुरस्कारातून घेण्यात आल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. महाकवी कालिदास कला मंदिरात होणाऱ्या सोहळय़ात कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी विश्वस्त आणि सल्लागार हेमंत टकले यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik bhushan award announced neelima pawa significant contributions rotary club of nashik 450 branch organization amy
First published on: 13-04-2022 at 02:13 IST