नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बुधवारी बारावीचा निकाल आभासी प्रणालीन्वये जाहीर झाला. नाशिक विभागाचा निकाल ९५.०३ (प्रथमच परीक्षार्थीसह) टक्के लागला असून विभागात धुळे जिल्ह्याने ९६.३७ टक्क्यांसह प्रथम क्रमांक मिळविला. नाशिक जिल्ह्याची निकालाची टक्केवारी ९२.६५ आहे. नेहमीप्रमाणे मुलींनी यंदाही मुलांना मागे टाकले आहे. १७ जून रोजी दुपारी तीन वाजता महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे वितरण करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

बुधवारी परीक्षेचा निकाल मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी एक वाजता प्रसिध्द झाला. परीक्षार्थीना निकाल पाहण्याची उत्सकुता असल्याने एकाच वेळी अनेकांनी संकेतस्थळावर लॉगीन केल्याने अनेकांना सव्‍‌र्हर डाऊनमुळे निकाल लवकर पाहता आला नाही. यामुळे एकमेकांशी संपर्क करत निकालाविषयी काही कळते काय, याची चाचपणी करण्यात आली. काहींनी निकाल जाणून घेण्यासाठी सायबर कॅफे तर, काहींनी भ्रमणध्वनी, घरातील संगणकाजवळ ठिय्या दिला होता. सव्‍‌र्हर डाऊनच्या संदेशामुळे अनेकांचे चेहरे हिरमुसले होते. परंतु, थोडय़ा वेळाने संकेतस्थळाने साथ दिल्यानंतर निकाल कळल्यानंतर घराघरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

नाशिक विभागात विज्ञान शाखेत ७४,३२२ पैकी ७३,३९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेचा निकाल ९८.७५ टक्के लागला. वाणिज्य शाखेत  २१,९९३ पैकी २०,६४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाखेची टक्केवारी ९३.८४ अशी राहिली. कला शाखेत ५९,०३० पैकी ५३,८७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल ९१.२७ टक्के लागला. व्यावसायिक अभ्यासक्रमात ५१७२ पैकी ४६९५ विद्यार्थी उत्तीर्ण असून ९०.७७ टक्के निकाल लागला.

विभागातील टक्केवारी

नाशिक विभागाने पुनर्परीक्षार्थीसह निकाल जाहीर केला.  धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातून एक लाख, ६४ हजार ९६२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील एक लाख ५४, ७६४  उत्तीर्ण झाले. विभागाचा निकाल  ९४.३५ (पुनर्परीक्षार्थीसह) टक्के लागला. यामध्ये जिल्हावार टक्केवारी नाशिक ९२.६५,  धुळे ९६.३७, जळगाव ९५.४६, नंदुरबार ९५.६३ अशी आहे. परीक्षा काळात ६० गैरमार्ग प्रकरणे प्राप्त झाली होती. त्यात नाशिक २२, धुळे २५, जळगाव आठ आणि नंदुरबार पाच प्रकरणांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी मुदत

विद्यार्थ्यांना गुण पडताळणी १० ते २० जून या कालावधीत आणि छायाप्रत मिळवण्यासाठी १० ते २९ जून या कालावधीत आभासी पध्दतीने शुल्क भरून अर्ज करता येईल. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असल्यास त्यांनी मंडळाशी संपर्क करावा. १७ जून रोजी महाविद्यालयात दुपारी तीननंतर गुणपत्रक वितरित होणार आहे. एकाच घरातील तीन पिढय़ा उत्तीर्ण त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आव्हाटे या गावात एकाच घरातील तीन जण बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले. यामध्ये लक्ष्मण देहाडे (४८, सासरे), रुतिका जाधव (२०, सून) आणि समीर देहाडे (१९, मुलगा) अशी त्यांची नावे आहेत.