नाशिक: व्यापारी वर्गाकडून हमाली, तोलाई व वाराई कपाती संदर्भात सर्वमान्य तोडगा निघेपर्यंत माथाडी-मापारी कामगारांनी दैनंदिन वजन मापाच्या कामकाजात सहभागी होणार नसल्याची भूमिका घेतल्यामुळे गुरुवारपासून जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांचे कामकाज ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. लासलगावसह विविध बाजार समित्यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत कांद्यासह कृषिमालाचे लिलाव बंद राहणार असल्याची सुचना शेतकऱ्यांना केली आहे.

माथाडी-मापारी कामगारांच्या मजुरीसह लेव्ही संदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नावर गुरुवारी येथील कामगार उपायुक्त कार्यालयात बैठक बोलावण्यात आली आहे. जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे अध्यक्ष तथा कामगार उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत कांदा व्यापारी संघटना व माथाडी-मापारी कामगार संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

हेही वाचा : “भाजपचा पराभव हेच उद्दिष्ट”, एमआयएमचे आमदार फारुक शाह यांची भूमिका

हमाली, तोलाई व वाराईसह लेव्हीचा वाद मागील काही वर्षांपासून सुरू आहे. लेव्हीची रक्कम व्यापाऱ्यांनी भरावी. असे निर्देश दिल्यानंतर माथाडी कामगार मंडळाने संबंधितांकडील वसुलीसाठी नोटीसा काढल्या होत्या. व्यापारी संघटनेने न्यायालयात अपिल केले. न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी त्यास स्थगिती दिली. या प्रकरणाची सुनावणी शनिवारी होणार आहे. दरम्यानच्या काळात व्यापारी वर्गाने हमाल, तोलाई कपात करायची नाही, असा निर्णय घेऊन लेव्हीचा प्रश्न उद्भवणार असा पवित्रा स्वीकारला. हा तिढा सुटत नाही तोवर दैनंदिन कामकाजातून दूर राहण्याची भूमिका माथाडी-मापारींनी घेतल्याने बाजार समित्यांमधील कृषिमालाचे व्यवहार विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा : भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीला जिल्हा बँकेकडून २६ कोटींचा लाभ, थकीत कर्जफेडीसाठी ‘ओटीएस’ योजनेत सहभाग

लासलगाव, मनमाड, नांदगावसह अनेक बाजार समित्यांमध्ये शेतकरी वर्गाच्या हिशेब पट्टीतून हमाली, तोलाई व वाराई कपातीसंदर्भात व्यापारी आणि हमाल, मापारी प्रतिनिधी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. लिलावात गैरसोय होऊ नये म्हणून बाजार समित्यांनी गुरुवारपासून पुढील आदेश होईपर्यंत बाजार समितीतील कांदा, कृषिमालाचे व्यवहार बंद ठेवले जाणार असल्याचे म्हटले आहे.