केंद्रात व राज्यात सत्ताधारी असणाऱ्या भाजपमध्ये मुंबईतील एका पदाधिकाऱ्याने महिलेला दिलेल्या अवमानास्पद वागणुकीची काही महिन्यांपूर्वी चर्चा झाली. यामुळे राजकीय पक्षातील महिला कार्यकर्त्यांची सुरक्षितता, त्यांना पक्षात मिळणारे स्थान, वागणूक या विषयी उहापोह झाला. मात्र आजही महिला सबलीकरणाचा नारा देताना राष्ट्रीय पक्ष म्हणवणाऱ्या भाजपमध्ये महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असल्याची बाब स्थानिक पातळीवर पुढे आली आहे.
दुष्काळी दौऱ्यात ग्रामीण भागातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्याचा अनुभव घेतल्यानंतर याबाबत वरिष्ठ पातळीवर गाऱ्हाणे मांडले. मात्र अद्याप या तक्रारीवर पक्षाने काय पाऊल उचलले ते गुलदस्त्यात आहे.
राजकारणात महिलांना आरक्षण मिळाले खरे, पण त्यांना सक्षमपणे काम करण्याची संधी अद्याप दिली जात नाही. कोणी तसा प्रयत्न केलाच तर त्याचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होतो. उलटपक्षी काही वेळा महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नावाखाली त्यांचे पती किंवा इतर नातेवाईकच मिरवून घेण्यात धन्यता मानतात असे दिसून येते. यामुळे महिलांचे पक्षातील स्थान डळमळीत राहिले आहे. पक्षांतर्गत खच्चीकरण केले जात असल्याचा अनुभव ग्रामीण भागातील महिला पदाधिकाऱ्याने घेतला. या संदर्भातील तक्रार संबंधित महिलेने वरिष्ठांकडे केली आहे. गेल्या मे महिन्यात भाजपचे मंत्री व आमदार दुष्काळी भागातील पाहणी करण्यासाठी जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यामध्ये महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे दौऱ्यावर असतांना महिला आघाडीच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी होत प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी जिल्ह्याची सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पदाधिकाऱ्याने मुंडे यांची भेट न घेऊ देता तुमचे इथे काय काम म्हणून घरचा रस्ता दाखविला. वध्र्याचे आमदार डॉ. पंकज भोईर यांच्या दौऱ्यावेळी तर भाजपच्या कार्यकर्त्यांना न बोलवता संबंधिताने शिवसेना कार्यकर्ते बोलावून भाजपच्या कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. या दौऱ्यात महिला कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अर्वाच्य भाषेत बोलत तुम्ही शोभेची बाहुली आहात, आमदारांजवळ खुर्ची पाहिजे का, दौऱ्यात फिरायचे नाही अशी दमबाजी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मुळात भाजप नेहमी महिला सबलीकरणाचे नारे देत असतो. जिल्ह्य़ातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अशी वागणूक मिळत असेल तर महिलांनी पक्षात काम करावे की नाही, असा प्रश्न पीडित महिलेने केला आहे. संबंधितांवर पक्षांतर्गत कारवाई करत महिला कार्यकर्त्यांसाठी पोषक वातावरण तयार करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात जिल्पक्ष संघटनाची धुरा सांभाळणाऱ्या पदाधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण सध्या मुंबईत असून नाशिकमध्ये आल्यावर याची शहानिशा केली जाईल, असे सांगितले. ज्या पदाधिकाऱ्याविरुध्द ही तक्रार आहे, त्याने हे सर्व आरोप फेटाळत आपण संघाचा स्वयंसेवक असून असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा केला. या एकंदर प्रकाराने ग्रामीण भागातील महिला कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik district bjp insulted women
First published on: 01-06-2016 at 03:28 IST