महापालिकेच्या कारभारात सर्वांनाच पारदर्शकता ठेवायची आहे. त्यात कुठल्याही प्रकारची तडजोड होणार नाही. जनतेने पक्षावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला कोठेही तडा जाऊ दिला जाणार नाही. महापालिका कारभार भ्रष्टाचारमुक्त असावा ही पदाधिकार्‍यांकडून, तसेच पक्षातील सर्व नगरसेवकांकडून अपेक्षा आहे. महापौर, उपमहापौरपदानंतर लवकरच स्थायीसह इतर समित्यांची मोठी जबाबदारी नव्या-जुन्यांचा मेळ साधत पक्षातील सदस्यांवर सोपविली जाईल. पक्षाने सर्व नगरसेवकांचे राजीनामे आधीच घेतले आहेत. योग्य पध्दतीने महापालिकेचे कामकाज न झाल्यास त्या नगरसेवकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिला.

महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी स्वामी नारायण मंदिर येथे पक्षातील नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दत्तक घेण्याच्या आवाहनास मतदारांनी जोरदार प्रतिसाद देत भाजपच्या हाती एकहाती सत्ता सोपविली. नगरसेवक म्हणून आपली वर्तणूक चांगली राखणे आवश्यक असून, पारदर्शी कारभारासाठी सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन महाजन यांनी केले.

पालकमंत्र्यांसह प्रदेश संघटनमंत्री रवी भुसारी, विभागीय संघटनमंत्री रवी काळकर, शहराध्यक्ष बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे आणि आमदार सीमा हिरे यावेळी उपस्थित होत्या. पालकमंत्री म्हणून नाशिकमध्ये लक्ष घालणार आहे. नाशिकच्या जनतेला नेमके काय हवे आहे, हे निवडणुकांआधीच जनतेकडून ऑनलाईन सूचनांद्वारे जाणून घेतले आहे. पक्षाच्या जाहीरनाम्यातही त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आता जनतेला जो शब्द दिला आहे, त्याची ध्येयपूर्ती करण्याच्या दिशेने भाजपची वाटचाल राहणार आहे. विमानतळाचा मुद्दा असो, उद्योग वाढीसाठीचे धोरण, शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न…असे अनेक प्रश्न हाती घेऊन ते सोडवण्यास प्राधान्य देण्यात येईल. गोदावरी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्नही सोडवण्यास प्राधान्य देण्यात येईल, असेही महाजन म्हणाले.

सामान्य कार्यकर्ता ते ज्येष्ठ नेते अशा प्रत्येकाच्या मेहनतीने हा आनंदाचा दिवस दृष्टिपथास आला. प्रचारात मुख्यमंत्र्यांसह भाजपने नाशिकचा विकास करण्याचे वचन दिले. नाशिककरांनी भाजपला एकहाती सत्ता दिल्याने आपली जबाबदारी वाढली आहे. एखादी लहान चूक पक्षाला अडचणीत आणणारी ठरू शकते. यामुळे प्रत्येक नगरसेवकाची वर्तणूक सार्वजनिक ठिकाणी व्यवस्थित राहील, याची प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. अतिशय महत्वाच्या जबाबदाऱ्या देताना पक्ष संबंधितांचे राजीनामे घेऊन ठेवत आहे. संबंधितांनी चांगले काम करणे अपेक्षित आहे. तसे काम न झाल्यास प्रसंगी संबंधित नगरसेवकांवर कारवाई करण्यास कचरणार नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, महापालिकेच्या दैनदिन कारभाराबाबत प्रशिक्षण देण्यासाठी लवकरच म्हाळगी प्रबोधिनी येथे दोन दिवसीय चिंतन अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात येणार आहे.