नाशिक – नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा हरित अर्थात पर्यावरणस्नेही राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात वेगळे चित्र समोर येत आहे. साधू-महंतांच्या वास्तव्यासाठी तपोवन परिसरात उभारण्यात येणाऱ्या साधूग्राम परिसरात सुमारे १७०० विविध प्रजातींचे वृक्ष तोडणे, पुनर्रोपण करणे वा फांद्या छाटण्याची तयारी महापालिकेने केली आहे. पर्यावरणप्रेमींमधून त्याचे तीव्र पडसाद उमटत आहे.
कुंभमेळ्यात देशभरातून येणाऱ्या वैष्णवपंथीय साधू-महंतांसाठी तपोवन परिसरात साधूग्रामची उभारणी केली जाते. आगामी सिंहस्थात मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेत प्रशासनाने सुमारे ११५० एकर क्षेत्रावर साधूग्राम उभारण्याचे नियोजन केले आहे. तपोवन परिसरात महापालिकेने ५४ एकर जागा यापूर्वीच अधिग्रहित केलेली आहे.
नाशिक शिवार दोनमधील सर्व्हे क्रमांक ३२६, ३२७-१, ३२७-२, ३२८-१, ३२९, ३३०-१, ३३०-२, ३३१, ३३२ व ३३३ या या जागेवरील सुमारे १७०० विविध प्रजातींचे वृक्ष तोडणे, पुनर्रोपण करणे, छाटणी आदींबाबत नोटीस देऊन हरकती व सूचना मागविल्या आहेत. नोटीसद्वारे जागेवरील केवळ सद्स्थिती मांडली गेली आहे. १७०० पैकी काही झाडे तोडावी लागतील, काहीचे पुनर्रोपण तर काही झाडांच्या केवळ फांद्या तोडाव्या लागणार आहेत. यातील ८० टक्के झाडे बाभूळ आहेत. लहान झाडे, झुडपांचाही अंतर्भाव असल्याचे महानगरपालिकेचे उद्यान अधिक्षक विवेक भदाणे यांनी म्हटले आहे.
प्रशासनाकडून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे पर्यावरणस्नेही अर्थात हरित कुंभ असे विपणन केले जाते. या पद्धतीने वृक्षतोड केली जाणार असल्याने शासन व प्रशासनाने हरित कुंभ हे नाव वापरू नये, असे आ्वाहन पर्यावरणप्रेमी अंबरिश मोरे यांनी केले. आगामी कुंभमेळा कॉक्रिटचा कुंभ राहणार आहे. आजवर इतके कुंभमेळा झाले, या झाडांचा कधी कुणाला त्रास झालेला नाही. मग आताच त्रास कसा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
निसर्ग हा हिंदू धर्माचा कणा आहे. निसर्गावर घाव घालून हिंदू धर्मातील कुंभमेळा भरवला जात असेल तर, ते अयोग्य आहे. अधिकारी वर्गात चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याची मानसिकता व धैर्य राहिलेले नाही. भव्य दिव्य कुंभमेळा करण्याच्या नावाखाली नाशिकच्या पर्यावरणचा ऱ्हास होईल. नाशिकचे तापमान जळगावच्या पातळीवर नेऊन ठेवण्याचा पण राजकीय नेत्यांनी केलेला दिसतो, अशा शब्दांत पर्यावरणप्रेमी मोरे यांनी वृक्षतोडीवर संताप व्यक्त केला. महानगरपालिका झाडे तोड्यात पटाईत आहे. त्यांनी पुनर्रोपण केलेली झाडे जगलेली नसल्याचा आक्षेप घेतला जात आहे.
दरम्यान, आगामी कुंभमेळ्याचे नियोजन कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या अधिपत्याखाली होत आहे. जळगाव जिल्ह्यातून ते प्रतिनिधित्व करीत असले तरी मागील कुंभमेळ्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. पर्यावरणप्रेमींनी थेट नामोल्लेख न करता कुंभमेळा मंत्र्यांनाही लक्ष्य केल्याचे दिसत आहे.
