नाशिक : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी राजकीय तसेच प्रशासकीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्या असताना पोलीस दलाच्या वतीने नाशिक कुंभसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. मनुष्यबळ, मानवी कौशल्य आणि कृत्रिम बुध्दिमत्ता या त्रिसूत्रीचा वापर, सीसीटीव्हीच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आपत्कालीन परिस्थिती तसेच गर्दी व्यवस्थापनासाठी प्रयत्न होणार आहेत.
कुंभमेळा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आलेला विषय. प्रयागराज येथील कुंभमेळ्यात आलेल्या अडचणी पाहता नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन सतर्कतेने सर्व विषय हाताळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत सातत्याने आढावा घेत आहेत. नाशिक पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दोन हजारांहून अधिक सीसीटीव्हीची मागणी केली आहे. हे सीसीटीव्ही शाही मिरवणूक मार्ग, स्नानघाट परिसर, भाविकांचे ये-जा करण्याचे मार्ग, बाह्य वाहनतळ आणि आतील वाहनतळ यासह अन्य ठिकाणी लावण्यात येणार आहेत. प्रशासकीय पातळीवर एका पर्वणीसाठी ७० लाखांहून अधिक गर्दी अपेक्षित असतांना ही गर्दी हाताळण्याचे आवाहन पोलिसांसह यंत्रणेसमोर आहे.
कृत्रिम बुध्दिमत्ता आणि उपलब्ध मनुष्यबळ यांचा वापर करत नियोजन करण्यात येणार आहे. कुंभमेळा कालावधीत विविध विभागांशी, अधिकाऱ्यांशी त्वरीत संपर्क साधणे, वेळोवेळी माहिती पोहचविणे, संदेश देवाण-घेवाण, नियंत्रण कक्ष, घटना नियंत्रण अधिकारी, आरोग्य आणि अग्निशमन विभाग यांच्यात समन्वय साधण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर उपयोगी ठरणार आहे. कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर करुन गर्दी हाताळण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पनेवर काम करण्यात येणार आहे. यामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भूमिका महत्वाची राहणार असून हे कॅमेरे गरजेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात येणार आहेत.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांव्दारे व्यक्तीसापेक्ष गर्दीचा अंदाज घेणे, ठराविक क्षेत्रफळात किती गर्दी झाली, याची सूचना मिळण्यास मदत होईल. गर्दीच्या हालचालीचे विश्लेषण केल्यास संभाव्य चेंगराचेंगरीची पूर्वसूचना मिळेल, गर्दीमध्ये हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेता येईल, संशयास्पद हालचाली, चोरी, गैरवर्तन बघून पुढील घटनांना अटकाव करता येणे शक्य होईल. कॅमेऱ्याच्या माध्यमातून गणवेशानुसार कर्मचारी, स्वयंसेवक, पोलीस अंमलदार ओळखता येतील. कर्मचाऱ्यांना गरजेनुसार संबंधित ठिकाणांवर कार्यरत करता येईल. गर्दीच्या हालचालीचा वेग मोजत ही गर्दी विशिष्ठ अंतर किती वेळात पार करेल, याचा अंदाज नियंत्रण कक्षाला घेता येईल. लिंग वर्गीकरण करुन पुरूष, स्त्री, मुलांची ओळख पटवता येईल. धूर आणि ज्वाला ओळखून आगीची लवकर सूचना मिळेल. अशा वेगवेगळ्या कामांसाठी सीसीटीव्हीची मदत होणार आहे.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पोलिसांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. कृत्रिम बुध्दिमत्तेनुसार नियोजन करण्यात येणार असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे योगदानही महत्वपूर्ण राहणार आहे. कुंभमेळ्यात होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करता येणे, यामुळे शक्य होणार आहे.