नाशिक – जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांची फसवणूक करणाऱ्या दोन परप्रांतीय व्यापाऱ्यांना वणी पोलिसांनी गुजरातमधील अहमदाबादेतून ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले असता १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

द्राक्षांचा हंगाम सुरु झाल्यावर दरवर्षी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार घडत असतात. परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून फसवणूक झाल्याच्या त्यात अधिक तक्रारी असतात. यासंदर्भात पोलिसांसह विविध शेतकरी संघटनांकडून शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येऊनही काही शेतकरी व्यापाऱ्यांच्या प्रलोभनाला बळी पडतात. जिल्ह्यातील शिंदवड येथील द्राक्ष उत्पादक शंकर बैरागी (५२) यांचा द्राक्षमाल परप्रांतीय व्यापाऱ्यांनी सहा लाख एक हजार रुपयांना खरेदी केला. परंतु, त्यांनी नंतर पैसे देण्यास नकार दिल्याने बैरागी यांनी लोकेंद्रसिंह, दिवाण सिंह आणि सुनील सिंह (रा.फत्तेपूर सिक्री, आग्रा, हल्ली मुक्काम खेडगाव, दिंडोरी, नाशिक) यासह चौघांविरोधात तक्रार केल्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा – नाशिक : पाण्याच्या बादलीत पडून बालिकेचा मृत्यू

लोकेंद्रसिंह, दिवाणसिंह हे बैरागी यांच्या शेतात पाच फेब्रुवारी रोजी द्राक्ष खरेदी करण्यासाठी आले. २५ रुपये प्रति किलो असा व्यवहार करुन आठ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत बैरागी यांच्याकडून द्राक्ष खरेदी करुन सदर व्यवहारापोटी ठरलेल्या ६,२७,५०० रकमेपैकी २६ हजार रुपये रोख दिले. उर्वरीत रकमेची बैरागी यांनी संशयितांकडे वारंवार मागणी करुनही त्यांनी व्यवहार पूर्ण केला नाही. वणी पोलिसांनी तक्रार प्राप्त झाल्यावर १६ मार्च रोजी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा – रावेर मतदारसंघात शरद पवार गट उमेदवार बदलणार ? संतोष चौधरी यांना अपेक्षा

सहायक निरीक्षक सुनील पाटील यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार व्यापाऱ्यांना शोधण्यासाठी पथक तयार केले होते .पोलिसांनी तपास करुन गुजरातमधील अहमदाबादेतून दिवाण चंद्रभान सिंह आणि सुनील चंद्रभान सिंह यांना शनिवारी ताब्यात घेतले. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले असता १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.