नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी नाशिकसह पाच जिल्ह्यांत आज एकूण ५५ टक्के मतदान झाले. सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडली.

विभागामध्ये नंदुरबार जिल्ह्यात ६२.०८ टक्के असे सर्वाधिक मतदान झाले. नाशिक जिल्ह्यात ४८.०५ टक्के असे सर्वात कमी मतदान झाले. कॉंग्रेस आघाडीचे डॉ. सुधीर तांबे, भाजपचे डॉ. प्रशांत पाटील, व डाव्या आघाडीचे प्रकाश (राजू) देसले हे निवडणुकीला उभे होते. त्यांचासह एकूण १७ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. या निवडणुकीचा निकाल येत्या सोमवारी स्पष्ट होणार आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी आज पाच जिल्ह्यातील एकूण ३५३ केंद्रांवर सकाळी ८ ते दुपारी ४ यादरम्यान मतदान प्रक्रिया पार पडली. १३६ मतदान केंद्र नाशिक जिल्ह्यात होते. अडीच लाख मतदारांपैकी निवडणुकीसाठी सायंकाळपर्यंत एकूण ५४.३८ टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाने यावेळी दिली.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त एकनाथ डवले आणि जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. यांनी मतदानकेंद्रांना यावेळी भेटी दिल्या.

विभागात एकूण दोन लाख ५६ हजार ४७२ मतदार होते. त्यापैकी एक लाख ३९ हजार ४७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी (दि.६) या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

नाशिक विभाग मतदान टक्केवारी

जिल्हा टक्केवारी

नंदुरबार       ६२.०८  टक्के

धुळे             ६१.३९  टक्के

जळगाव       ५८.०१  टक्के

अहमदनगर   ५६.६१  टक्के

नाशिक         ४८.०५  टक्के

 

जिल्हा      स्त्री       पुरूष      एकूण

नंदूरबार    २०१८     ७२३६    ९२५४

धुळे         ३६२४    ११९८३  १५६०७

जळगाव   ४२४९   १५७३०  १९९७९

अहमदनगर १०६३२  ३७८१० ४८४४२

नाशिक  १२२५०   ३३९४३   ४६१९३

एकूण   ३२७७२ १०६७०२  १३९४७५