नाशिक : ऐन उन्हाळ्यात शहरात काही ठिकाणी कृत्रीम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनाकडून पाणी कपातीची टांगती तलवार डोक्यावर असतांना बुधवारी नवीन नाशिक (सिडको) परिसरात जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.

गेल्या काही दिवसात शहर परिसरात काही ठिकाणी अघोषित पाणी कपात सुरू आहे. कधी कमी दाबाने तर, कधी कमी वेळ पाणी पुरवठा अशा वेगवेगळ्या अडचणींना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत बुधवारी सिडकोतील प्रभाग क्रमांक २९ मधील देवांग सर्कल या भागात रस्त्यालगत असलेली जलवाहिनी फुटली. यासंदर्भात मनपा पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली असता पाणी पुरवठा विभागाने दुर्लक्ष केल्याने गुरुवारी पहाटे लाखो लिटर पाणी वाया गेले.

हेही वाचा >>> मनमाड बाजार समिती निवडणूक : आमदार कांदे-धात्रक गटात हाणामारी

तक्रार करण्यासाठी सिडको मनपा विभागीय कार्यालयातील पाणीपुरवठा अधिकारी गोकुळ पगारे यांना भ्रमणध्वनी केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याचे दिसले. याबाबत माजी नगरसेविका छाया देवांग, सामाजिक कार्यकर्ते दिलीप देवांग आणि इतरांनी नाराजी व्यक्त केली. जल वहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याने परिसरातील भागात कमी दाबाने पाणी पुरवठा झाला. मनपाने जल वाहिनी दुरुस्त करावी, अशी मागणी दिलीप देवांग यांनी केली आहे. पगारे यांच्याशी प्रतिनिधीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उन्हाळ्यात सिडकोतील काही भागात पाण्याची समस्या असताना दुसरीकडे सिडकोतील प्रभाग क्रमांक २९ मधील देवांग सर्कल या भागात जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.

– दिलीप देवांग (सामाजिक कार्यकर्ता)