नाशिक: नाशिक लोकसभा मतदारसंघात ६०.७५ टक्के मतदान झाले असून शहरातील तीन विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत ग्रामीणमधील तीन विधानसभा मतदारसंघात अधिक मतदान झाले. त्यातही सिन्नर आणि इगतपुरी या भागात मतदानाचा जोर अधिक होता. भाजपच्या प्रभावक्षेत्रात कमी मतदान झाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ५९.५३ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी १.२२ वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक लोकसभा मतदारसंघाची अंतिम आकडेवारी प्रशासनाने जाहीर केली. या मतदारसंघात १९१० केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला असतानाही मतदारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. मतदानाची वेळ संपुष्टात येत असताना काही केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. यामुळे मतदानाची टक्केवारी लक्षणीय वाढल्याचा अंदाज वर्तविला जात होता. प्रत्यक्षात गतवेळच्या तुलनेत यावेळी मतदानात १.२२ टक्क्यांनी वाढ झाली. या निवडणुकीत महायुतीचे हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर, अपक्ष शांतिगिरी महाराज यांच्यासह एकूण ३१ उमेदवार रिंगणात होते. प्रमुख उमेदवार ज्या भागातील होते, त्या भागात अधिक मतदान झाले. वाजे यांच्या सिन्नर विधानसभा मतदारसंघात ६९.५० तर गोडसे वास्तव्यास असणाऱ्या देवळाली मतदारसंघात ६२.०५ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत सर्वाधिक ७२.२४ टक्के मतदान इगतपुरी या आदिवासीबहुल भागात झाले. इगतपुरी, सिन्नर आणि देवळाली विधानसभेचा काही भाग ग्रामीण भागात येतो. या ठिकाणी नाशिक शहराच्या तुलनेत अधिक मतदान झाल्याचे टक्केवारीतून दिसून येते.

हेही वाचा : दिंडोरी मतदारसंघात मतांचा पाऊस, ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे उत्स्फुर्तता

भाजपच्या प्रभाव क्षेत्रातील मतदान

नाशिक शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. भाजपचे आमदार आणि कार्यकर्ते प्रचारात सक्रिय होते. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी दोन, तीन दिवस त्यांनी प्रयत्न केले. आपले हक्काचे मतदान होण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न झाले. तथापि, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात कमी मतदान झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. नाशिक पश्चिममध्ये ५४.३५, नाशिक मध्य ५७.१५ आणि नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात ५५.३८ टक्के मतदान झाले. देवळाली आणि सिन्नर या दोनही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत. या ठिकाणी तुलनेत अधिक मतदान झाले. मात्र, दोन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवार याच भागातील असल्याने वाढीव मतदान नेमके कुणासाठी झाले, याची स्पष्टता निकालानंतर होईल.

हेही वाचा : नाशिक : भावली धरणात बुडून पाच जणांचा मृत्यू ; एकाच कुटूंबातील चौघांचा समावेश

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान

नाशिक लोकसभा मतदारसंघात २० लाख ३० हजार १२४ पैकी १२ लाख ३३ हजार ३८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ३८ तृतीयपंथी मतदारांचाही समावेश आहे. विधानसभानिहाय विचार करता सिन्नरमध्ये दोन लाख १३ हजार ४५, नाशिक पूर्व दोन लाख १५ हजार १५२, नाशिक मध्य एक लाख ८७ हजार ४९१, नाशिक पश्चिम दोन लाख ४७ हजार ८९६, देवळालीत एक लाख ७१ हजार ८२४ आणि इगतपुरीत एक लाख ९७ हजार ९७५ मतदारांनी मतदान केले. मतदान टक्केवारीत ग्रामीण आघाडीवर असले तरी शहरात मतदारांची संख्या अधिक होती. त्यामुळे टक्केवारी कमी राहिली तरी मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या मात्र ग्रामीणच्या मतदारांइतकीच, किंबहुना काही ठिकाणी अधिक असल्याचे दिसून येते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik lok sabha 2024 60 75 percent voter turnout css