नाशिक – ‘ऑपरेशन सिंदूर‘च्या निमित्ताने उडालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षात मानवरहित विमानांनी (ड्रोन) किमान धोक्यात शत्रूचे अधिकतम नुकसान कसे करता येते हे दाखवले. आधुनिक युद्धात हेलिकॉप्टर आणि दूरसंवेदकामार्फत नियंत्रित केली जाणारी मानवरहित विमाने (आरपीएएस) मध्यवर्ती भूमिकेत असणार आहेत. त्यामुळे लष्करी हवाई दलाने आता आपल्या हेलिकॉप्टर वैमानिकांना आरपीएएस अर्थात डोन वैमानिकात परावर्तीत करण्यास सुरुवात केली आहे.
नाशिकजवळील गांधीनगर येथील आर्मी एव्हिएशन स्कूलच्या दीक्षांत सोहळ्यात (कॅट्स) हेलिकॉप्टर वैमानिक असणाऱ्या अधिकाऱ्यांची तुकडी ‘आरपीएएस’ अर्थात ड्रोन वैमानिक म्हणून लष्करी हवाई दलात दाखल झाली. यामध्ये तिन्ही सैन्य दलात ‘आरपीएएस’ प्रशिक्षक ठरलेल्या पहिल्या महिला हिमाचल प्रदेशातील मेजर इशा ठाकूर व पंजाबमधील मेजर जगमित कौर यांचाही समावेश आहे. त्यांचा अपवाद वगळता तुकडीतील सर्व आरपीएएस वैमानिक हे हेलिकॉप्टर वैमानिक असल्याचे स्कूलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ठाकूर आणि कौर यांच्याकडे पूर्वी अन्य जबाबदारी होती. हेलिकॉप्टर वैमानिकांना प्राधान्याने मानवरहित विमान संचलन प्रशिक्षणासाठी निवडले जात आहे.
आर्मी एव्हिएशन कोअरचे महासंचालक लेफ्टनंट जनरल विनोद नांबियार यांनी आधुनिक युद्धात हेलिकॉप्टर आणि आरपीएएस (ड्रोन) महत्वाची भूमिका पार पाडणार असल्याचे नमूद केले. कमीतकमी धोका पत्करून शत्रूचे अधिकाधिक नुकसान करणे महत्वाचे असते. त्यासाठी हेलिकॉप्टर आणि आरपीएएसची (ड्रोन) मजबूत व्यवस्था उभारणी जात आहे. ज्यात वैमानिक हेलिकॉप्टर मोहिमा राबवेल, तसेच दूरसंवेदकांमार्फत मानवरहित विमानांच्या प्रणालीचे संचलन करेल. प्रशिक्षणात त्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. दलाच्या भात्यात हल्ला चढविणाऱ्या आधुनिक हेलिकॉप्टरबरोबर प्रिटेडर एमक्यू – १, रिपर यासारखे आधुनिक ड्रोनही दाखल होण्याच्या मार्गावर आहेत. दोन इंजिन असणाऱ्या हेलिकॉप्टर उड्डाणात वैमानिकांना निष्णांत केले जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सैन्यदलात पहिल्या महिला ड्रोन प्रशिक्षक
हिमाचल प्रदेशातील मेजर इशा ठाकूर आणि पंजाबमधील मेजर जगमित कौर या दूरसंवेदकाच्या सहाय्याने संचलित केल्या जाणाऱ्या मानवरहित विमान प्रणालीच्या (आरपीएएस) भारतीय सैन्यदलातील पहिल्या महिला प्रशिक्षक बनल्या आहेत. हेलिकॉप्टर वैमानिकापाठोपाठ लष्कराने ड्रोन संचलनात मुलींना संधी उपलब्ध केली आहे. आरपीएएस संचलनात महिलांचा सहभाग वाढत असल्याचे उभयतांनी सांगितले. जगमित कौर यांंना लष्करी पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडील आणि आजोबा सैन्यदलात होते. हिमाचल प्रदेशातील इशा ठाकूर यांची मात्र कौटुंबिक लष्करी पार्श्वभूमी नाही. त्यांचे वडील हॉटेल व्यावसायिक असून आई शिक्षिका आहे.