नाशिक महानगरपालिका निवडणुकीत अनेक अनपेक्षित निकालांची नोंद झाली आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. उमेदवारीच्या बदल्यात २ लाख रुपये घेताना भाजप कार्यालयातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यात पक्षाची बदनामी झाली होती. यानंतर पक्षाने याप्रकरणी निवडणूक आयोगाला केलेला खुलासा, पक्षातील वाढती बंडखोरी, २४ बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी यानंतर भाजपला या निवडणुकीत फारसे यश मिळणार, असेही अनेकांचे मत झाले होते. अनेकांनी शिवसेना, मनसेपाठोपाठ भाजपला तिसरे स्थान दिले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजकीय विश्लेषकांचे अंदाज चुकवत भाजपने नाशिकमध्ये बाजी मारली. मात्र या निवडणुकीत भाजपमधील अनेकांचे अंदाजदेखील चुकले. भाजपने पक्षात प्रवेश दिलेला आणि बंडखोरी करुन अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेल्या कुख्यात गुंड पवन पवारला मतदारांनी नाकारले. भाजपने २४ बंडखोरांना नारळ दिला होता. मात्र पवन पवारने कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र भाजपने पावन करुन घेतलेल्या पवन पवारला मतदारांनी नाकारले. प्रभाग क्रमांक १८ मध्ये भाजपच्या शरद मोरेंनी पवन पवारचा पराभव केला.

प्रभाग १३ मधून शिवसनेचे उमेदवार आणि मनसेचे माजी महापौर यतीन वाघ यांचा गजानन शेलार यांनी दारूण पराभव केला. पाच वर्षांपूर्वी नाशिकमध्ये मनसेची सत्ता आल्यावर यतीन वाघ महापौर झाले होते. यतीन वाघ यांचा पराभव करणाऱ्या गजानन शेलार यांच्यासह राष्ट्रवादीतील वत्सला खैरे, काँग्रेसचे मातब्बर नेते शाहू खैरे आणि मनसेच्या सुरेखा भोसले विजयी झाले. या सर्व नेत्यांनी निवडणूक लागण्यापूर्वीच प्रभाग युती करून मैत्रीपूर्ण लढत देत या निवडणुकीत विजय मिळवला.

प्रभाग क्रमांक २५ मधून मनसेचे गटनेते अनिल मटाले यांचा शिवसेनेच्या श्यामकुमार साबळेंकडून दारूण पराभव झाला. मनसे पक्ष स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले मातब्बर नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांच्या पराभवाने पक्षातील अनेकांना धक्का बसला आहे. पंचवटीत भाजपने निर्विवाद वर्चस्व राखत प्रभाग क्रमांक १ मध्ये सर्व जागांवर विजय मिळवला आहे. या विजयी उमेदवारांमध्ये रंजना भानसी, अरुण पवार, गणेश गिते, पूनम धनगर यांचा समावेश आहे.

नाशिकमधील अंबड लिंक रोडवरील भंगार बाजाराचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न होता. हा बाजार इतरत्र नेण्यासाठी शिवसेनेचे दिलीप दातीर यांनी गेल्या अनेक अनेक वर्षांपासून न्यायालयीन लढा दिला होता. या प्रकरणाचा महापालिका आणि पोलीस आयुक्तालयाकडे वर्षानुवर्षे पाठपुरावा करणाऱ्या दिलीप दातीर यांनी प्रभाग क्रमांक २६ मधून विजय मिळवला.

 

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik municipal corporation election 2017 big fight against veterans unexpected results
First published on: 23-02-2017 at 20:06 IST