प्रचारासाठी उमेदवारांची पायाला भिंगरी

महानगरपालिकेतील निवडणुकीतील प्रचाराची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उमेदवारांनी पायाला भिंगरी लावूनच प्रचारात उतरले असून पहाटे जॉंगिंक ट्रकवर तर सायंकाळच्या मंदिरातील आरर्त्यांना हजेरी लावून उमेदवारांनी प्रचाराची कोणतीही संधी सोडलेली नाही. ‘द्राविडी प्राणायाम’द्वारे तिकीट मिळवल्यानंतर सर्वपक्षीय उमेदवारांसह अपक्ष व आघाडीतर्फे रिंगणात उतरलेल्या तब्बल ८२१ उमेदवारांनी आपापल्या पध्दतीने प्रचाराचा नारळ फोडत मतदारांना साद घालण्यास सुरूवात केली आहे. उमेदवारांचा भर प्रत्यक्ष गाठीभेटीवर असला तरी नातेवाईक, मित्र परिवाराच्या मदतीने समाज माध्यमासह वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत जोरदार प्रचार सुरू झाला आहे.

निवडणूक चिन्ह वाटपाची प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रचारासाठी सर्वच उमेदवारांना केवळ ११ दिवसाचा कालावधी मिळाला आहेत. प्रभाग पुनर्रचनेत प्रभागांचे क्षेत्र कमालीचे विस्तारल्याने इतक्या कमी कालावधीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे आव्हान आहे. प्रत्येक प्रभागात साधारणत: सरासरी ४० ते ४५ हजार मतदार आहे.

क्षेत्र विस्तृत असल्याने कमी वेळात संपूर्ण परिसरात भेटी गाठी व्हाव्यात, असा प्रत्येकाचा प्रयत्न आहे. त्यामुळे पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे उमेदवारांची धडपड सुरू झाली आहे. दोन प्रभागांचा अपवाद वगळता २९ प्रभाग चार सदस्यीय आहेत. प्रत्येक प्रभागात सेना, भाजप व काँग्रेस आघाडीने सर्वच म्हणजे चारही जागांवर उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे. काही पक्षांचा त्यास अपवाद आहे. अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या काहींनी पॅनलची बांधणी करून प्रचाराचा नारळ फोडला तर बंडखोरी करणाऱ्या काहींनी सहकारी मित्रांच्या मदतीने ‘एकला चलो रे’चा मार्ग स्वीकारला आहे.

इतर प्रभागात राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी एकत्रितपणे प्रचार चालविला आहे. प्रभाग क्रमांक सातमधील भाजपच्या उमेदवार स्वाती भामरे यांनी पक्षाचे चारही उमेदवार एकत्रितपणे प्रचार करत असल्याचे सांगितले. दिवसभरात साधारणत: २०० ते २५० घरांना भेटी देऊन उपलब्ध दिवसात संपूर्ण प्रभागातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. प्रभाग क्रमांक २७ मधील शिवसेनेच्या उमेदवारांची अवस्था वेगळी नाही. भल्या सकाळपासून सुरू होणारा प्रचार रात्री दहापर्यंत सुरू असतो, अशी माहिती सेनेच्या उमेदवार किरण गामणे यांनी दिली. दररोज हजारो मतदारांची भेट घेतली जात आहे. प्रभाग क्रमांक ३१ मधील भाजप उमेदवारांनी मतदारांच्या संयुक्तपणे गाठीभेटी घेण्यासोबत सकाळी वासननगरसह इतर जॉगिंग ट्रॅकवर सकाळी हजेरी लावत आहेत.

इतकेच नव्हे तर, प्रभागातील मंदिरांमध्ये सायंकाळी होणाऱ्या आरतीवेळी स्थानिक नागरिक उपस्थित असतात. या ठिकाणी एकत्रितपणे मतदार भेटत असल्याने त्या ठिकाणी हजेरी लावून भेटी घेतल्या जात असल्याचे भाजपच्या उमेदवार पुष्पा आव्हाड यांनी सांगितले. कमी वेळ असल्याने अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याची सर्वच उमेदवारांची धडपड असून त्यात राजकीय पक्ष वा अपक्ष उमेदवार मागे राहिलेले नाहीत.

मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादीत प्रचार समन्वय

प्रत्येक पक्षाचे सर्व उमेदवार बहुतांश ठिकाणी एकत्रितपणे प्रचार करत आहेत. मात्र काही प्रभागात मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादीने समन्वय साधला. त्याचे प्रत्यंतर प्रभाग १३ मधील या तिन्ही पक्षांच्या संयुक्त प्रचार फेरीने आले. काँग्रेसचे शाहू खैरे व वत्सलाताई खैरे, राष्ट्रवादीचे गजानन शेलार आणि मनसेच्या सुरेखा भोसले या उमेदवारांनी संयुक्त प्रचार फेरी काढत मतदारांना आश्चर्याचा धक्का दिला. वास्तविक, इतर प्रभागात काँग्रेस आघाडी आणि मनसेचे उमेदवार परस्परांसमोर शड्डू ठोकून आहेत. हा एक प्रभाग त्यास अपवाद ठरला. या उमेदवारांनी एकत्रितपणे काढलेल्या फेरीमुळे मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली. रुग्णाला घेऊन निघालेली रुग्णवाहिका या कोंडीत अडकून पडली.