कपिला संगमावर गटारीचे पाणी
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत जिल्हा प्रशासन व महापालिकेने युद्ध पातळीवर शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. त्यातही विशेषत: गोदा प्रदूषण मुक्तीसाठी शपथ, स्वच्छता मोहीम असे उपक्रम राबविले गेले. परंतु या निर्धाराला छेद देणारी कृती महापालिकेकडून होत असून सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता तपोवन येथे कपिला संगम परिसरात ते सोडले जात असल्याचा आरोप गोदावरी गटारीकरण विरोधी मंचने केला आहे. याबाबत योग्य उपाय न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा मंचने दिला आहे.
जिल्हा प्रशासनाने रविवारी राबविलेल्या स्वच्छता अभियानात ७०० मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला. गोदा प्रदूषण मुक्तीसाठी पुढाकार घेऊन गोदावरी आणि नंदिनी नदीपात्र स्वच्छतेसाठी प्रयत्न करण्यात आले. मोठय़ा वाजतगाजत ही मोहीम राबविली गेली असली तरी प्रत्यक्षात त्यास छेद देणारी कृती शहर परिसरात घडत आहे. गोदावरी नदीत महानगरपालिकेकडून सर्रास सांडपाणी सोडण्यात येत आहे. या विरोधात मंचने गोदावरी प्रदूषणाबाबत आधीच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर सुनावणी सुरू असताना उच्च न्यायालयाने गोदावरीत गटारीचे पाणी सोडू नये असे निर्देश महापालिकेला दिले आहेत. खुद्द महापालिकेने गोदावरी नदीत जाणाऱ्या १९ नाल्यांपैकी काही नाले तात्पुरते व काही नाले हे कायमचे बंद केले असल्याचे न्यायालयात लिहून दिले आहे, परंतु गंगापूर येथील नाल्यातून गटारीचे पाणी थेट गोदावरी नदीत सोडले जात आहे. कपिला संगम तपोवनजवळ मलनिस्सारण केंद्राच्या चेंबरला जोडलेल्या वाहिनीद्वारे गटारीचे पाणी वारंवार गोदावरीत सोडले जात असल्याचे मंचचे निशिकांत पगारे यांनी म्हटले आहे. याबाबत तातडीने उपाययोजना न झाल्यास हा मुद्दा न्यायालयासमोर मांडण्याचा इशाराही मंचने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik municipal corporation not serious for pollution free godavari
First published on: 07-06-2016 at 05:07 IST