मिळकती लिलाव प्रक्रियेने देण्याची तयारी

उत्पन्न वाढीसाठी नवीन मिळकतींवर करवाढ आणि मोकळ्या जमिनींवरही कर लागू करणारी महापालिका आता स्वत:च्या मिळकती बाजारभावानुसार लिलाव प्रक्रियेने देण्याच्या तयारीत आहे. शहरात पालिकेच्या ९०३ मिळकतींपैकी बहुतांश आजी-माजी नगरसेवक किंवा त्यांच्या संस्थांच्या ताब्यात आहेत. निम्म्या अर्थात ४०० मिळकतींना मंजुरीदेखील घेतली गेलेली नाही. १३६ मिळकतींच्या करारनाम्याची मुदत संपुष्टात आली आहे. यामुळे नोटिसा बजावत प्रशासनाने अल्प दराने दिलेल्या, विनामंजूर, करार मुदत संपलेल्या मिळकती ताब्यात घेण्याची तयारी केली आहे. अनेक ठिकाणी अभ्यासिका, व्यायामशाळा तत्सम उपक्रम राबविले जातात. त्यांच्याकडून व्यावसायिक भाडे आकारणी योग्य नसल्याचे मत नगरसेवक मांडत आहेत. या मिळकतींवरून नगरसेवक आणि प्रशासन यांच्यात नवीन संघर्ष उभा ठाकला आहे. मिळकती बाजार भावानुसार लिलाव प्रक्रियेने देऊन महसूल वाढविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

पालिका आयुक्त तुकाराम मुंढे कर रचनेत सुधारणा करण्याची गरज वारंवार मांडत आहेत. पालिकेच्या व्यापारी संकुलातील थकबाकी वसुलीला वेग देताना प्रसंगी गाळे ताब्यात घेण्याची कारवाई राबविली जात आहे. पालिकेच्या मालकीच्या मिळकती आहेत.

महासभा, स्थायी समितीच्या ठरावाद्वारे आजवर त्या नाममात्र दराने एक ते १०० रुपये अथवा काही ठिकाणी यापेक्षा थोडी अधिक रक्कम आकारून त्या दिल्या जात होत्या. मध्यंतरी झालेल्या सर्वेक्षणात धक्कादायक बाबी समोर आल्या. अभ्यासिका, व्यायाम शाळा, क्रीडा सभागृह, समाज मंदिर आदी तत्सम उपक्रम या ठिकाणी राबविले जातात.

बहुतांश मिळकती नगरसेवक अथवा त्यांच्याशी संबंधित संस्थांच्या ताब्यात आहेत. विनामंजुरी दिलेल्या, करार मुदत संपलेल्या, बाजार भावापेक्षा कमी असणाऱ्या सर्व मिळकती मनपाच्या ताब्यात घेऊन संबंधितांकडून त्याची वसुली करण्यात येणार आहे. या मिळकती बाजारभावानुसार लिलाव प्रक्रियेने देण्याचे आयुक्त मुंढे यांनी आधीच जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने संस्थांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

सर्वसाधारण सभेत त्याचे पडसाद उमटले होते. नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी या मिळकतींच्या आधारे शहरात अभ्यासिका संस्कृती रुजविल्याचे म्हटले होते. नाशिकरोड येथील एक अभ्यासिका महापालिका चालवते. तिची दुर्दशा झाली आहे. सेवाभावी वृत्तीने लोकप्रतिनिधी हे काम करतात. ठिकठिकाणी शेकडो विद्यार्थी अभ्यासाकरिता त्यांचा वापर करीत आहे. नगरसेवकांना अनेकदा खिशातून पैसे भरून कामकाज करावे लागते.

या परिस्थितीत अभ्यासिकांसाठी व्यावसायिक दराचा निकष लावणे अयोग्य असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. अभ्यासिका महापालिकेला चालविता येईल, असा मुद्दा चर्चेत मांडला गेला. आजी-माजी नगरसेवकांशी संबंधित संस्थांच्या ताब्यात अनेक मिळकती आहेत. त्या ताब्यात घेताना प्रशासन-नगरसेवक यांच्यात नवीन वाद होण्याची चिन्हे आहेत. त्यात अभ्यासिकांचा दररोज उपयोग करणारे विद्यार्थी भरडले जाणार असल्याचे चित्र आहे.

निम्म्या मिळकती मंजुरीविना ताब्यात

एकूण ९०३ पैकी केवळ २४ मिळकती करार मुदतीतील आहेत. करार मुदत संपलेल्या १३६, तर ठरावान्वये ९३ मिळकती ताब्यात आहेत. विनामंजुरी ताब्यात असलेल्या मिळकतींची संख्या ४०० आहे. महापालिका अंगणवाडी, बालवाडीसाठी सुमारे २५० मिळकतींचा वापर करते. काही विनावापर पडून आहेत. प्रभागनिहाय विचार केल्यास महापालिकेच्या सर्वाधिक २३१ मिळकती पंचवटी विभागात, तर सर्वात कमी ९९ मिळकती सातपूर विभागात आहेत. नाशिक पूर्वमध्ये १८६, नाशिक पश्चिम ११८, नवीन नाशिक विभागात १६५, नाशिकरोड विभागात १०४ मिळकतींचा समावेश आहे.