गरज भासल्यास खासगी डॉक्टर सहकार्य करणार, संशयिताबाबत मोठय़ा रुग्णालयाकडून हलगर्जीपणा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : शहरात अद्याप करोनाचा एकही रुग्ण आढळला नसला तरी प्रशासकीय यंत्रणा कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. विदेशातून येणारे नागरीक वा संशयितांच्या विलगीकरणासाठी अतिरिक्त स्वतंत्र इमारतीची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे.

महापालिकेच्या रुग्णालयांत डॉक्टर (फिजिशियन) कमतरता आहे. करोना संशयित रुग्णांवर उपचारासाठी त्यांची निकड असते. ही कमतरता भरून काढण्यासाठी फिजिशियन संघटनेने मदतीची तयारी दर्शविली आहे. विदेशातून येणारे नागरीक, करोनाची लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांनी माहिती न दडवता स्वत:सह इतरांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी जिल्ह्य़ात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे.  संशयितांची संख्या वाढल्यास पूर्वतयारी म्हणून काही अतिरिक्त विलगीकरण केंद्र उभारण्याचे नियोजन आहे. महापालिका, आरोग्य विभाग आणि खासगी रुग्णालये यांच्यामार्फत ही व्यवस्था केली जाईल.

सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून राज्यात काही ठिकाणी यात्रोत्सवावर निर्बंध घातले गेले. शुक्रवारी शहरात काही मंडळांनी प्राचीन रहाडींमध्ये रंगपंचमी दणक्यात साजरी करण्याचे नियोजन केले आहे. यावर काही निर्बंध घालता येतील का, याबद्दल जिल्हा प्रशासनाशी विचार विनिमय केला जाईल, असे गमे यांनी सांगितले. महापालिकेच्या आरोग्य विभागात डॉक्टरांची कमतरता आहे. करोना संशयितांवर फिजिशियन उपचार करू शकतो. तातडीचा उपाय म्हणून नाशिक फिजिशियन संघटनेशी चर्चा करण्यात आली आहे. संघटनेच्या डॉक्टरांनी मदतीची तयारी दर्शविल्याचे गमे यांनी नमूद केले.

विदेशातून आलेले नागरिक, लक्षणे जाणवणाऱ्या व्यक्तींनी आपली माहिती शासकीय यंत्रणेकडे देणे आवश्यक आहे. आतापर्यंत महापालिका हद्दीतील विदेशातून आलेल्या ज्यांच्यावर उपचार झाले, त्यांची माहिती संबंधितांऐवजी इतरांकडून मिळाली. त्याआधारे पालिकेच्या वैद्यकीय पथकांनी तपासणी करून आवश्यक त्यांना विलगीकरण कक्षात दाखल केल्याचे गमे म्हणाले.

हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयास विचारणा

दुबईहून एक व्यक्ती मुंबईहून चांदवडला गेली. तेथून परतताना त्याला त्रास होऊ लागला. नातेवाईकांनी त्याला शहरातील आडगाव नाका परिसरातील मोठय़ा रुग्णालयात दाखल केले. या व्यक्तीला हृदयविकाराशी संबंधित त्रास असल्याने या रुग्णालयाने अन्य कोणतीही शहानिशा न करता त्यानुसार उपचार सुरू केले. याची माहिती समजल्यानंतर महापालिकेचे वैद्यकीय पथक रुग्णालयात धडकले. संबंधित रुग्णाची तपासणी केल्यावर त्यास विलगीकरण कक्षात ठेवणे गरजेचे असल्याचे लक्षात आले. त्यास शासकीय रुग्णालयातील कक्षात हलविण्यात आले. या रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका आदींशी संपर्क आला होता. यामुळे संबंधितांना त्यांच्या घरी काही दिवस विलग ठेवण्याचे निर्देश मोठय़ा रुग्णालयास देण्यात आले. नावाजलेल्या रुग्णालयाने हे प्रकरण हाताळतांना हलगर्जीपणा दाखवला. यावरून संबंधितांना नोटीस बजावून विचारणा करण्यात आली. खासगी रुग्णालयांनी हलगर्जीपणा दाखविल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik municipal corporation ready to prevent coronavirus infection zws
First published on: 13-03-2020 at 02:54 IST