नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांच्या नियुक्तीसाठी गुरुवारी (दि. ३०) सकाळी ११.३० वाजता महासभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे स्थायी समितीवर निवड होण्यासाठी विविध पक्षातील नगरसेवकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
सत्ताधारी भाजपला रोखण्याकरिता शिवसेनेकडून रिपब्लिकन पक्षासह युती करण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. महापालिका सभागृहात भाजपचे ६६, शिवसेनेचे ३५, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी ६, मनसेचे ५, अपक्ष ३ व रिपाइं १ नगरसेवक असे पक्षीय बलाबल आहे. भाजपचे ९ सदस्य स्थायी समितीवर नियुक्त होणार असल्याने १६ सदस्यांच्या सभागृहात भाजपला स्थायीसाठी सत्ता गाठणे फारसे खडतर राहणार नाही. मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एका सदस्याबरोबर गटनोंदणी केल्याने या पक्षाचे प्रत्येकी ७ सदस्य होतात. मनसेने यापूर्वीच एका अपक्षाला सोबत घेऊन गटनोंदणी केल्याने मनसेचे सहा सदस्य झाले आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षांचा प्रत्येकी एक सदस्य स्थायीत पोहोचणार आहे. शिवसेनेने यापूर्वीच गटनोंदणी केली आहे. त्यामुळे आता रिपाइंच्या एका सदस्याबरोबर युतीची नोंदणी करण्याचे प्रयत्न आहेत. स्थायीचा सत्ता कलश भाजपला सहजासहजी मिळू न देण्याचे शिवसेना पक्षासह काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेचे प्रयत्न राहतील. भाजप व शिवसेनेसह अन्य पक्षांचे प्रत्येकी आठ-आठ सदस्य झाल्यास चिठ्ठी पद्धतीतून सभापतिपदाची नियुक्ती करण्यात येतील. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या महासभेकडे आता नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik municipality standing committee election
First published on: 27-03-2017 at 22:22 IST