त्र्यंबकेश्वर शहरातील एका माजी सैनिकाचे घर बेकायदा ठरवत ते हटविल्याचा आरोप करत श्रमजीवी संघटनेचे आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशासाठी आज हटून बसले. पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना या जागेवरून हटवले व सर्व आंदोलकांना अटक केली. आज दुपारी अडीच वाजता हा प्रकार घडला.
माजी सैनिक रामराव लोंढे यांना न्याय मिळावा, यासाठी श्रमजीवीनी हा मोर्चा काढला होता. लोंढे यांना सरकारने दिलेल्या जागेवरचे केलेले बांधकाम तोडले व नगरसेवकांची सरकारी जमिनीवरची अतिक्रमणे तशीच सुरक्षित ठेवली, अशा आशयाचे निवेदन घेत सरकारी यंत्रणेवर विविध आरोप करत आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी गोंधळ घातला.
विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले. यानंतर आंदोलकांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजाला वंदन करण्याची परवानगी मागितली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश करून आंदोलन करण्याचा आंदोलकांचा पवित्रा लक्षात आल्यानंतर आंदोलकांना या ठिकाणाहून हटविण्याची तयारी पोलिसांनी केली.
मानवी साखळी करत आंदोलकांनी पोलिसांना विरोध करण्याचा यावेळी प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलनकर्त्यांना घटनास्थळावरून हटवून पोलीस मुख्यालय येथील ग्रीन बॅरेक येथे नेले. विवेक पंडीत व जवळपास सव्वाशे आंदोलनकर्त्यांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आंदोलनामध्ये महिला देखील सहभागी होत्या. त्यांना देखील पोलिसांनी याठिकाणाहून हटविले.