श्रीलंका पर्यटन मंत्रालयाच्या वतीने आयोजित ‘मिसेस ग्लोबल युनिव्हर्सल’ स्पर्धेत येथील पूनम बिरारी यांना ग्लोबल युनिव्हर्सल आणि टाइमलेस ब्युटीक्वीन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पूनम या येथील जे.एम.सी.टी. केंद्रातून एमबीएचे शिक्षण घेत असून त्यांनी अनेक वर्षे योग शिक्षण घेतले आहे.
स्पर्धेत ७० देशांच्या स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यातील २९ देशांतील सौदर्यवतींमधून पूनम यांनी ब्युटीक्वीनचा किताब मिळविला. स्पर्धेत शारीरिक पात्रता, देखणेपणा, हजरजबाबीपणा अशा विविध टप्प्यांवर व्यक्तिमत्त्व चाचण्या घेण्यात आल्या. योगामुळे शारीरिक आणि मानसिक स्थैर्य लाभल्याने जागतिक यश मिळविता आले, असे पूनम यांनी सांगितले. यशानंतर पूनम यांना सिनेसृष्टीतून अभिनयासाठी तसेच काही जाहिरातींसाठी विचारणा होत आहे. मागील वर्षी झालेल्या मिसेस महाराष्ट्र स्पर्धेतही त्यांनी यश मिळविले होते. भविष्यातील मिस पॅसिफिक स्पर्धा जिंकण्याचे पूनम यांचे ध्येय आहे.