नाशिक – शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय झाल्याने नाशिककरांच्या संयमाचा बांध फुटू लागल्याने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर खड्ड्यांचा मुद्दा भाजपसाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता लक्षात घेत भाजपने आता खड्डे बुजविण्याकडे संपूर्णपणे लक्ष दिले आहे. महापालिकेत प्रशासकांच्या हातात कारभार जाण्याआधी भाजपची एकहाती सत्ता होती. त्यामुळे शहरातील रस्त्यांना पडणाऱ्या खड्ड्यांना भाजपही जबाबदार असल्याचे टिकास्त्र विरोधकांकडून सोडण्यात आले आहे. नाशिकमध्ये तीन आमदार असलेल्या भाजपची सारवासारव करताना धांदल उडत आहे. शहरातील इतर अनेक प्रश्नांसह खड्ड्यांचा विषय विरोधकांकडून काढण्यात येत असलेल्या मोर्चांमध्येही मुख्य मुद्दा झाला आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर, सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच नाशिक येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार असल्याने यावेळी होणाऱ्या महापालिका निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे. एकिकडे कुंभमेळ्याच्या तयारीचा गाजावाजा होत असताना शहर मात्र खड्ड्यात गेले आहे. खड्ड्यांमधून रस्ता शोधताना वाहनचालकांच्या कौशल्याची कसोटी लागत आहे. महात्मा गांधी रोड, स्मार्ट रोड, मेनरोड यांचे काँक्रिटीकरण झाले असल्याने या रस्त्यांची स्थिती तशी बरी म्हणावी लागेल. इतरत्र मात्र ठणाणा आहे. सिडको, मखमलाबाद रोड, म्हसरुळ-रासबिहारी जोडररस्ता, मखमलाबाद-अमृतधाम जोडरस्ता, इंदिरानगर, नाशिकरोड, सातपूर या भागांमध्ये खड्डेच खड्डे आहेत. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी, एकमेकांच्या वाहनांना धक्का लागून वादावादी, असे प्रकार होत आहेत. कित्येक दिवसांपासून नाशिकचे नागरिक हा त्रास सहन करत असताना किमान गणेशोत्सवात तरी शहरातील खड्डे बुजविले जातील, अशी नाशिककरांना अपेक्षा होती. परंतु, सतत सुरु असलेल्या पावसाचे कारण पुढे करत खड्डे बुजविणे टाळले गेले.

खड्ड्यांमुळे होणाऱ्या टिकेचा फटका आगामी महापालिका निवडणुकीत बसण्याचा अंदाज आल्यावर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी पाऊस थांबल्यावर सर्व विभागात खड्डे दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घेतली जातील. त्यासाठी नाशिकमध्ये दोन दिवस मुक्काम करण्याची वेळ आली तरी आपण मुक्कामी राहू, असे आश्वासन अलीकडेच दिले होते. बुधवारी शहरात प्रागतिक पक्ष आणि जनसंघटनांनी एकत्रितरित्या महापालिकेवर मोर्चा काढला. या मोर्चात इतर अनेक मागण्यांसह नाशिकमधील खड्डे हा विषयही होता. १२ सप्टेंबर रोजी शिवसेना (उध्दव ठाकरे) आणि मनसे यांचा नाशिक महानगरासह जिल्ह्यातील इतर प्रश्नांविषयी एकत्रित मोर्चा निघणार आहे. त्यातही नाशिकमधील खड्डे हा विषय आहे.

नाशिकमधील खड्ड्यांचा विषय असा केंद्रस्थानी आल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी महापालिका प्रशासनास आठवडाभरात सर्व खड्डे बुजविण्याचे आदेशच दिले. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून आता खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली आहे. किती खड्डे बुजविले जातात, आणि बुजविलेले खड्डे किती दिवस टिकतात, याविषयी मात्र नाशिककरांमध्ये साशंकता कायम आहे.