शेतकऱ्यांसह मिळकतधारकांकडून प्रश्नांचा भडिमार
नाशिक-पुणे महामार्ग चौपदरीकरणाचे काम एकदाचे सुरू झाले असले तरी महामार्गात जमीन जाणारे शेतकरी आणि मिळकतधारकांच्या समस्या सुटलेल्या नसल्याने रविवारी नाशिक-सिन्नरदरम्यान कामाची पाहणी करण्यासाठी गेलेले खा. हेमंत गोडसे यांच्यासह अधिकाऱ्यांवर त्यांनी प्रश्नांचा भडिमार केला.
सिन्नरफाटा ते सिन्नरदरम्यान महामार्गाच्या कामाने वेग घेतला असून भूसंपादनात अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गोडसे यांनी या परिसराचा दौरा केला. आ. राजाभाऊ वाजे, आ. योगेश घोलप, प्रकल्पाचे काम करणाऱ्या चेतक एन्टरप्राइजचे प्रकल्प संचालक सुनील भोसले, व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता रतिलाल सोमवंशी, साहाय्यक अभियंता एच. डब्लू. मोरे आदी या वेळी उपस्थित होते. नाशिक रोडच्या सिन्नर फाटय़ापासून गुरेवाडीपर्यंत २५.३१ किलोमीटरचा रस्ता वर्षभरात पूर्ण करावयाचा आहे. डुबेरेजवळील बांधावरून महामार्ग जाणार असल्याने नदीत पाइपलाइन टाकण्यात आली आहे. पावसाळ्यात पाइपमध्ये कचरा अडकल्यास पाणीपुरवठय़ाची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे येथे लहान पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. जमीन दिली असतानाही अद्याप मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. भूसंपादनासाठी सरकारी दर वेगळे, प्रत्यक्षात मोबदला कमी मिळतो. बागायतीला जिरायतीचा मिळणे, जमीनची मोजणी न करताच मोबदला देणे अशा समस्या ग्रामस्थांनी मांडल्या. किती जमीन ताब्यात घेण्यात आली ते अधिकाऱ्यांना माहीत नसल्याचेही या वेळी उघड झाले. धनगरवाडी येथे महामार्गावर चौफुली करावी, घाटावरील सांगळे वसाहतीजवळील पाण्याने भरलेल्या विहिरी बुजवू नयेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. औद्योगिक वसाहतीसाठी जमीन दिली असतानाही महामार्गाचे वळण मुद्दामहून बदलण्यात आल्याचा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
शिंदे गावाजवळ भुयारी मार्ग न करता तो दूरवर करण्यात आल्याने नागरिकांना एक किलोमीटरचा फेरा मारावा लागणार असल्याचे जगन आगळे यांनी निदर्शनास आणले. पळसे साखर कारखान्याजवळ उसाच्या गाडय़ा नेण्यासाठी बोगदा उंच करण्याची सूचना करण्यात आली. दरम्यान, गोडसे यांनी सर्व समस्या केंद्र सरकारकडे मांडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. शक्य असेल त्या ठिकाणी भुयारी मार्ग तसेच इतर उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी अधिकाऱ्यांना केल्या. प्रकल्प संचालक सुनील भोसले यांनी राष्ट्रीय महामार्गाचे नियम पाळून उर्वरित समस्या सोडविण्यात येतील, असे नमूद केले.