नाशिक : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भाजपने नाशिक महानगरच्या भल्यामोठ्या कार्यकारिणीत सर्व जाती समूह, धर्म व अगदी प्रांतातील घटकांना देखील स्थान देण्याचा प्रयत्न केला असला तरीही राजी-नाराजीचे नाट्य रंगले आहे. अनेक वर्षांपासून काम करणाऱ्यांना दुय्यम पदे आणि अलीकडेच पक्षात आलेल्यांना महत्वाची जबाबदारी दिली गेल्याची भावना उमटत आहे. नवनवीन विभागांच्या (सेल) माध्यमातून पक्षाने अनेकांचे समाधान केले आहे.
भाजप नाशिक महानगरची २०२३-२६ या कालावधीसाठीची कार्यकारिणी शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी जाहीर केली. वरिष्ठांशी विचार विनिमय करून ही नावे निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. निवडणुकीच्या तोंडावर कुणीही सक्रिय कार्यकर्ता कार्यकारिणीबाहेर असू नये, असा विचार बहुदा पक्षाने केला असावा. यातून तिचा आकार कमालीचा विस्तारला गेला. पण, त्याने नाराजी थांबली नसल्याचे उमटलेल्या प्रतिक्रियांमधून समोर येत आहे. नव्या कार्यकारिणीत प्रशांत जाधव हे अध्यक्ष असतील. त्यांच्या सोबतीला तब्बल १५ उपाध्यक्ष आहेत.
हेही वाचा : धुळे महापालिकेतून जन्म-मृत्युचे दाखले आता मोफत; महासभेत निर्णय
यात पवन भगुरकर (माध्यम प्रभारी) जगन पाटील, सतीश सोनवणे, सुनील देसाई, देवदत्त जोशी, अजिंक्य साने, सुनील खोडे, संध्या कुलकर्णी, सुनील फरांदे, कुणाल वाघ, ॲड. मिनल भोसले, नीलेश बोरा, निखील पवार, धनंजय माने, गणेश बोलकर यांचा समावेश आहे. नव्या कार्यकारिणीत पाच सरचिटणीस असून सुनील केदार, काशिनाथ (नाना) शिलेदार, ॲड. श्याम बडोदे, हिमगौरी आडके -आहेर, रोहिणी वानखेडे–नायडू यांच्यावर ती जबाबदारी सोपविली गेली आहे. चिटणीसांची संख्याही १५ आहे. कोषाध्यक्षपदी आशिष नहार, कार्यालयीन चिटणीसपदाची जबाबदारी अरूण शेंदुर्णीकर यांच्याकडे असणार आहे.
हेही वाचा : पुणे विद्यापीठ उपकेंद्र इमारतीचा विस्तार गरजेचा, सागर वैद्य यांचा कुलगुरूंना प्रस्ताव
युवा मोर्चाची जबाबदारी सागर शेलार, महिला मोर्चा सोनाली ठाकरे, अनुसूचित जाती मोर्चा राकेश दोंदे, आदिवासी मोर्चा- राजेंद्र राजवाडे, किसान मोर्चा – बापूराव पिंगळे, अल्पसंख्यांक मोर्चा आरिफ काजी, ओबीसी मोर्चाची धुरा अजय आघाव यांच्यावर देण्याात आली. निवडणुकीच्या तोंडावर नव्या काही आघाड्यांची निर्मिती झाली. यात कामगार, उत्तर भारतीय, उद्योग, व्यापारी, भटके-विमुक्त यांचा समावेश आहे. अध्यात्मिक समन्वय, जैन, पदवीधर, राजस्थान, चित्रपट, क्रीडा, योग या विभागांची जबाबदारी स्वतंत्रपणे दिली गेली आहे. पक्ष विविध विभाग (सेल) नव्या जोमाने कार्यप्रवण करणार आहे. त्या अनुषंगाने वैद्यकीय, कायदा, सहकार, माजी सैनिक, ज्येष्ठ कार्यकर्ती, अपंग, वाहतूक, दक्षिण भारतीय, शिक्षक, सांस्कृतिक, बुध्दिजिवी, अंत्योदय, आयटी, गुजराती अशा विभागांची धुरा नव्या पदाधिकाऱ्यांना दिली गेली.
हेही वाचा : शनिवारी नाशिक शहरात पाणी पुरवठा बंद
कार्यकारिणीत सदस्यांच्या यादीत अनेकांना स्थान देण्यात आले. स्थानिक पातळीवर ज्येष्ठ नेते, माजी लोकप्रतिनिधी कायम निमंत्रित म्हणून काम करतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष, विद्यमान आमदार व खासदार, मंत्री,माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नेते हे विशेष निमंत्रित म्हणून कार्यरत असतील. नव्या कार्यकारिणीत सर्व जाती, धर्म, प्रांत व समुहांना न्याय देण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येते.
नाराजवंतांमध्ये खदखद
पक्ष संघटनेत सरचिटणीस पद महत्वाचे मानले जाते. निर्णय प्रक्रियेत त्याचा समावेश असतो. जमिनीवर काम करणारी व्यक्ती एकंदर स्थितीची अध्यक्षांना माहिती देत असते. काहींना या पदाचे आश्वासन दिले गेले होते. परंतु, ऐनवेळी त्यांची वेगळ्याच पदांवर नियुक्ती झाल्याची भावना उमटत आहे. पक्ष संघटनेत प्रदीर्घ काळापासून काम करण्याचा विचार झाला नाही. बाहेरून अर्थात नव्याने आलेल्यांना पदे दिली गेल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत आहे. या नाराजीचे दूरगामी परिणाम होतील. ते लगेच दिसणार नाहीत, अशी चर्चा दबक्या आवाजात होत आहे.