शहरासह ग्रामीण भागातही वाढते शहरीकरण, लोकसंख्या, औद्योगिकरण, दळणवळणाच्या सुविधा यामुळे बदलणारा चेहरा, त्यातून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिने निर्माण होणाऱ्या अडचणी यावर मात करण्यासाठी नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक व्ही. के. चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलीसांनी ‘प्रतिसाद अ‍ॅप’ तयार केले आहे.
नाशिक जिल्हा पोलीस अधिक्षक संजय मोहिते यांच्या सहकार्याने महिला, मुली तसेच शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, ज्येष्ठ नागरिक यांना संकटसमयी तातडीने पोलिसांची मदत मिळावी या उद्देशाने हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यास आपली प्राथमिक माहिती विचारली जाईल. यामध्ये नाव, वय, पत्ता, रक्तगट, भ्रमणध्वनी क्रमांक व ओळखपत्र विचारले जाईल. ही माहिती भरल्यानंतर संकटसमयी असतांना आपली माहिती ज्या सक्षम नातेवाईकांना कळविणे गरजेचे आहे त्याचे नाव, भ्रमणध्वनी क्रमांकही भरावा लागणार आहे. ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर नाव नोंदणी होईल. त्यानंतर ‘इमर्जन्सी’ नावाची कळ भ्रमणध्वनीवर दिसू लागेल. ज्यावेळी आपण संकटात असाल त्यावेळी ही कळ दाबल्यास तुम्ही धोक्यात असल्याची माहिती पोलिीसांना मिळेल. तसेच ती माहिती आपल्या नातेवाईकासही मिळेल. शिवाय ज्या परिसरात तुम्ही आहात त्या ठिकाणची माहिती पोलिसांना देत प्रत्यक्ष कामास सुरूवात होईल.
या सेवेसाठी भ्रमणध्वनी, इंटरनेट व जीपीएस या सुविधा आवश्यक आहेत. ज्या नागरिकांना अ‍ॅप डाऊनलोड करण्यात अडचणी येऊ शकतात त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन मदत घ्यावी, असे आवाहन अधिक्षक संजय मोहिते यांनी केले आहे.
वाढती गु्न्हेगारी आणि प्रामुख्याने महिलांची होणारी छेडछाड, लूटमार यांसारखे प्रकार रोखण्यासाठी हे अ‍ॅप मदतशील ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik rural police make pratisaad app
First published on: 26-04-2016 at 03:20 IST