नाशिक – शहराजवळील लोहशिंगवे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेची चर्चा सुरु असताना शिंदे परिसरात काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. सोमवारी पहाटे पळसे येथील शेतकरी विनोद जाधव यांच्या मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला.
काही महिन्यांपासून शहरातील बिबट्याचा मुक्त संचार मानवी वस्तीमध्ये वाढला आहे. पर्यावरणप्रेमींकडून यासाठी शहराचा होणारा विस्तार आणि जंगल कमी होणे, याकडे बोट दाखवले जात आहे. कॉलनी परिसर अथवा ग्रामीण भागात घरासमोर असलेले पशुधन बिबट्याची शिकार होत आहे. या शिकारीच्या शोधात पशुधनासह मानवावरही हल्ले होऊ लागले आहेत. अलिकडेच लोहशिंगवे परिसरात एका युवकाचा बिबट्याच्या हल्लात मृत्यू झाला. नागरिकांमध्ये भीतीचे सावट कायम आहे.
काही दिवसांपासून शिंदे पळसे परिसरात बिबट्याचे दर्शन वारंवार होत आहे. परिणामी शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांमध्ये भीती आहे. परिसरातील काही जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा देखील बिबट्याने फडशा पाडला होता. शिंदे, पळसे परिसरात मळे असल्याने बिबट्याला लपण्यासाठी जागा मिळते. त्याच्या पावलांचे ठसे अनेक ठिकाणी दिसतात. वनविभागाकडे ग्रामस्थांनी तक्रार नोंदवल्यानंतर अधिकारी सुमित निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अनिल अहिरराव यांच्या पथकाने या परिसराची पाहणी केली. गट नं ५९५ येथे पिंजरा लावण्यात आला.
सोमवारी पहाटे जाधव यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अखेर जेरबंद झाला. बिबट्याच्या डरकाळ्याचे आवाज येऊ लागल्यावर ग्रामस्थांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. बिबट्या जेरबंद झाल्याचे लक्षात येताच वनविभागाला याविषयी माहिती देण्यात आली. वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जेरबंद बिबट्याला सुरक्षितरित्या ताब्यात घेत त्याला म्हसरूळ येथील वन्यजीव उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे. जेरबंद बिबट्या तीन ते चार वर्षाचा आहे. नागरिकांनी या ठिकाणी अन्यत्र पिंजरे लावावेत तसेच वनविभागाच्या वतीने गस्त वाढविण्याची मागणी करण्यात आली.
नागरिकांनी सावध रहावे
बिबट्या जेरबंद झाला असला तरी ही समस्या सुटलेली नाही. परिसर बागायती असल्याने बिबट्याचे वास्तव्य असू शकते. नागरिकांनी रात्री उशीराने एकट्याने बाहेर पडू नये, जनावरांना सुरक्षितरित्या अन्य ठिकाणी बांधून ठेवावे. वनविभागाच्या वतीने प्रबोधन सुरू असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले.
