नाशिक-सिन्नर महामार्गाच्या विस्तारीकरणात मोहदरी घाटासह अनेक ठिकाणी रस्त्यावर मुरूम व माती पसरल्याने ही बाब दुचाकीधारकांसाठी धोकादायक ठरली आहे. विस्तारासाठी खोदलेला भाग काही बुजविलेला तर काही तसाच आहे. अलीकडेच मोहदरी घाटात मालमोटारीचा धक्का लागून झालेल्या अपघातात वृध्देचा मृत्यू झाला. रस्त्यावर पसरलेल्या मातीमुळे दुचाकी घसरणे अन् तत्सम किरकोळ अपघात वाढत आहेत. विस्तारीकरणाच्या कामामुळे वाहनधारकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत असताना शासकीय यंत्रणांनी रस्ता सुरक्षा धोरणाच्या अंमलबजावणीकडे डोळेझाक केल्याचे चित्र आहे.
प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेल्या नाशिक-सिन्नर दरम्यानच्या सुमारे २७ किलोमीटर रस्त्याच्या विस्तारीकरणास दोन महिन्यांपूर्वी सुरूवात झाली. विशेष आर्थिक क्षेत्र तसेच औद्योगिक वसाहतीमुळे दररोज नाशिकहून सिन्नरला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे, तशीच स्थिती सिन्नरहून नाशिकला येणाऱ्यांची आहे. शिवाय, नाशिक-पुणे आणि नाशिक-शिर्डी मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. यामुळे नाशिक-सिन्नर या प्रवासाला तासभराचा अवधी लागतो. हा प्रवास सुसह्य करण्याच्या उद्देशाने विस्तारीकरणाचे हाती घेतले गेले, मात्र, सद्यस्थितीत ते छोटय़ा वाहनधारकांची डोकेदुखी ठरले आहे. साधारणत: आठ दिवसांपूर्वी मोहदरी घाटात एका वळणावर मालमोटारीचा दुचाकीला धक्का लागल्याने झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला तर हेल्मेट असल्याने त्यांचा मुलगा बचावला. रस्त्याच्या कामामुळे दुचाकी वाहनांची सर्वाधिक कोंडी झाली आहे. मूळ मार्गालगत विस्तारीकरणासाठी खोदकाम करण्यात आले. खडी-मुरूम टाकताना आवश्यक ती दक्षता घेतली जात नसल्याने माती रस्त्यावर येते. परिणामी अनेक ठिकाणी धुरळा उडतो. त्यात मार्गक्रमण करताना ब्रेक दाबल्यास मातीमुळे दुचाकी घसरतात. मूळ रस्ता व विस्तारीत मार्गाचे खोदकाम यात अद्याप समान पातळी नसल्याने ओव्हरटेक करताना समोरून वाहन आल्यास दुचाकीधारकांना बाजुला जाण्यासाठी काही ठिकाणी जागा शिल्लक राहत नाही. ही स्थिती अपघातांना निमंत्रण देण्यास कारक ठरल्याची वाहनधारकांची तक्रार आहे. या संदर्भात सिन्नरचे आ. राजाभाऊ वाजे यांनी रस्त्यावर येणारी माती व मुरूम तातडीने हटविण्याची सूचना कंत्राटदाराला केल्याचे सांगितले. सुरक्षिततेसाठी कंत्राटदाराने पथक तैनात केले असून मार्गावरील आढावा घेत असल्याचे वाजे यांनी नमूद केले.
शासकीय यंत्रणांची डोळेझाक
काही महिन्यांपूर्वी राज्य शासनाने अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षा धोरणास मान्यता दिली. रस्ते अपघातास अकुशल चालक, अपात्र वाहने, प्रभावी अंमलबजावणीची कमतरता, रस्त्यांची सदोष रचना आणि उपाय योजनेत संबंधित यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव हे घटक कारणीभूत आहेत. अपघातांत वाढ, त्यामुळे होणारी दुखापत व मृत्यू यामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. या पाश्र्वभूमीवर, मांडलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा धोरणाच्या संकल्पनेच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी परिवहन विभागावर सोपविली. रस्त्याचा अयोग्य व चुकीचा आराखडा आणि अपुऱ्या पायाभूत सुविधा अपघातास कारक ठरतात. यामुळे रस्त्यांची रचना, बांधणी व देखभाल करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महामार्ग प्राधिकरण या यंत्रणांमध्ये परिवहन विभागाला समन्वय ठेऊन नियमितपणे निरीक्षण करण्यास सूचित करण्यात आले. परंतु, नाशिक-सिन्नर रस्त्याच्या विस्तारीकरणात रस्ते सुरक्षा धोरणाच्या अंमलबजावणीत शासकीय यंत्रणांनी डोळेझाक केल्याचे दिसते.