महापालिकेची आर्थिक तिजोरी मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक १७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज वितरण सुरू झाले असून तो सादर करण्यास १५ मार्च अंतिम मुदत आहे. सत्ताधारी भाजपच्या नऊपैकी सात सदस्य महिलाच आहेत. यामुळे महिला सदस्यांच्या आशा उंचावल्या आहेत.  तरीही विरोधकांची मोट बांधून उमेदवार उभा करण्याचे शिवसेनेने ठरवले आहे.

स्थायी समितीत भाजपचे नऊ, तर शिवसेनेचे चार, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, अपक्ष प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकावरून आयुक्त आणि सत्ताधारी यांच्यात बेबनाव झाला होता. नियमावलीचा आधार घेऊन आयुक्तांनी अंदाजपत्रक थेट सर्वसाधारण सभेत सादर करण्याचे सूचित केले. एकहाती सत्ता असलेल्या भाजपची यामुळे अडचण झाली. दर वर्षी आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात स्थायीकडून नवीन कामे, योजना समाविष्ट करीत वाढ केली जाते. स्थायीच्या अंदाजपत्रकात पुढे सर्वसाधारण सभेत आणखी भर घातली जाते, असा अनुभव आहे. यंदा स्थायीमार्फत सर्वसाधारण सभेत ते सादर करण्याची संधी हिरावली जाईल असे वाटत असताना महापौरांनी थेट सभेत मांडले जाणारे अंदाजपत्रक पुन्हा स्थायीकडे पाठविले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. म्हणजे आयुक्तांकडून सर्वसाधारण सभेत येणारे अंदाजपत्रक पुन्हा स्थायीकडे पाठविले जाईल. स्थायीकडून नंतर ते पुन्हा सर्वसाधारण सभेत येईल. यंदा अंदाजपत्रक दोन वेळा सर्वसाधारण सभेत येणार आहे. या पाश्र्वभूमीवर, भाजपची स्थायी समिती गठीत होऊन सभापती निवड प्रक्रिया लवकर पार पडावी अशी मानसिकता आहे. त्या अनुषंगाने नवीन सदस्यांचे ठराव तत्परतेने पाठविले गेले.

नगरसचिवांनी स्थायी सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार १७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी अर्ज विक्रीला सुरूवात झाली असली तरी सोमवारी दुपापर्यंत एकही अर्ज नेण्यात आलेला नव्हता. १५ मार्च अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. निवडणुकीच्या दिवशी माघारीची मुदत राहणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

भाजपचे शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप यांनी उमेदवारी महिलेला द्यायची की पुरूष सदस्याला हे निश्चित झाले नसून दोन दिवसात नाव निश्चित होईल असे म्हटले आहे. शिवसेना सभापती पदासाठी उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. विरोधकांची मोट बांधून उमेदवार दिला जाणार असल्याचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले. त्या संदर्भात विरोधी पक्षांची बैठक बोलावली जाणार आहे.

उमेदवारीसाठी रस्सीखेच

स्थायीत भाजपच्या हिमगौरी आहेर-आडके, भिकूबाई बागूल, शांता हिरे, मिरा हांडगे, कोमल मेहेरोलिया यांच्यासह पुष्पा आव्हाड, भाग्यश्री ढोमसे या महिलासह एकूण नऊ सदस्य आहेत. सभापतीपदासाठी यंदा महिला वर्गात चुरस पहावयास मिळण्याची चिन्हे आहेत.