नाशिक महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना घरात शौचालय असल्याचा दाखला देण्याचा नियम उमेदवारांना फारसा पटलेला नाही. उमेदवारांमधून या निर्णयावरुन संमिश्र प्रतिक्रिया येत असून विशेषतः महिला उमेदवारांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना घरात शौचालय असल्याचा दाखला देणे निवडणूक आयोगाने बंधनकारक केले आहे. दाखल्यासाठी उमेदवाराचा स्वत:चा शौचालयासोबतचा फोटो जोडावा अशी अट आयोगाने घातल्यामुळे नाशिकमधील महिला नेत्या संतप्त झाल्या आहेत. यापूर्वी निवडणूक लढवताना उमेदवारांना थकबाकी व चारित्र्य पडताळणी दाखला देणे बंधनकारक होते. आता यामध्ये या नव्या नियमाची भर पडल्याने महिला उमेदवारांसह पुरुष उमेदवारही नाराज आहेत. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना ‘स्वच्छ भारत’ अभियानाअंतर्गत घरात शौचालय असल्याचा दाखला देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नाशिक महापालिकेकडे दीड हजारांपेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांनी या दाखल्यासाठी अर्ज केले आहेत. मात्र शौचालयासोबतचा फोटो यासाठी जोडावा लागत असल्याने महिला उमेदवारांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या नियमावर नाराजी व्यक्त करताना मनसेच्या नेत्या जयश्री पवार म्हणाल्या, आजच मी जिल्हाधिकारी कार्यालयात एका कामासाठी गेले असताना त्या ठिकाणी असलेल्या शौचालयात अत्यंत अस्वच्छता आढळून आली. याठिकाणी सर्वत्र दुर्गंधी पसरलेली होती. अशा अनेक सरकारी कार्यालयांची दयनीय अवस्था आहे. नाशिकमध्ये प्रत्येक प्रभागात स्वच्छ सुलभ शौचालय नाहीत आणि आम्ही मात्र अर्जासोबत घरातील शौचालयासह आमचा फोटो देणे हे अत्यंत लज्जास्पद असल्याचे त्यांनी ‘लोकसता ऑनलाईन’शी बोलताना सांगितले. पुरुष उमेदवारांमध्ये या निर्णयावर नाराजी पसरली आहे. ‘हा निर्णय अतिशय हास्यास्पद असून सध्या शहरातील प्रत्येक प्रभागात शौचालयाची वानवा आहे. त्यामुळे या निर्णयाशी मी असहमत आहे’ असे भाजपचे इच्छुक उमेदवार संजय नवले यांनी सांगितले.
एकीकडे यावर नाराजी व्यक्त होत असतानाच काही उमेदवार या निर्णयाचे स्वागत करतानाही दिसतात. निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार कामिनी दोंदे यांनी या निर्णयाचे स्वागत केले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाशी मी सहमत असून आपली याबाबत कुठलीही हरकत नसल्याचेही त्या म्हणाल्या.