नाशिक : गुलाबी थंडीची तीव्रता वाढत असतांना नाशिककरांना ‘पंतगोत्सव’चे वेध लागले असले तरी यंदा संक्रातीच्या पतंगोत्सवाचा रंग फिका आहे. संक्रांत आठ दिवसांवर आली असली तरी आकाशात पतंग दिसत नाहीत. तंत्रज्ञानामुळे संगणक आणि भ्रमणध्वनीच्या वेडात गुरफटलेली तरुणाई मैदानी खेळांपेक्षा पब्जीसारख्या आभासी खेळांमध्ये रमू लागली आहे. त्यामुळे लोप पावणाऱ्या मैदानी तसेच पारंपरिक खेळांमध्ये पतंगांचाही समावेश होतो की काय अशी साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

संक्रातीच्या दिवशी अवकाशात रंगबेरंगी पतंगींचा मेळा भरत असला तरी नाताळच्या सुटय़ांपासूनच आकाशात पतंगी दिसण्यास सुरूवात होते. संक्रातीच्या दिवशी पतंग कापाकापीच्या स्पर्धेत उतरण्याआधी नाताळच्या सुटीपासून अनेकांचा सराव सुरू होतो. डिसेंबर अखेरीस बाजारात निरनिराळे पतंग, मांजा चक्री यांच्या विक्रीला सुरूवात होत असते. संक्रातीच्या चार दिवस आधी पतंग विक्री वाढेल या आशेने बाजारात यंदा रंगीबेरंगी, विविध आकारातील पतंग विRीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये ‘बिग डॉग’ ही पॅराशूट कापडापासून तयार करण्यात आलेली पतंग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कागदी आणि प्लास्टिक पतंगांच्या तुलनेत आकर्षक दिसणारी आणि उडविण्यास सोपी असणारी कापडी पतंग ३० पासून २००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. बिग डॉगसह पिकाचू, डोरेमॉन, जोकर, अँग्री बर्ड, हल्क, विमान, गरूड या आकारातील कापडी पतंगी ग्राहकांच्या पसंतीस उतरत असल्याचे विक्रेते प्रताप चव्हाण यांनी सांगितले. कापडी पतंगांना हौशी पतंगबाजांकडून प्राधान्य मिळते ते ‘पतंगोत्सवासाठी’. त्यासाठी खास १६ कॉड हा मांजा वापरला जातो. काही वर्षांंपासून पतंग महोत्सवांचे प्रमाण वाढल्याने या पतंगांना मागणी वाढल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.

बच्चेकंपनीचा हट्ट पुरविण्यासाठी धोबी, बजक अशा कागदी पतंगांची खरेदी केली जात असून जास्त मोठे, महागडे पतंग घेण्याऐवजी छोटय़ा आणि मध्यम आकाराच्या पतंग खरेदीकडे ग्राहकांचे लक्ष असते. साध्या पतंगांची किंमत तीन रुपये ते ५० रुपयांदरम्यान असून अमृतसरची टूक्कल पतंग १०० रुपयांपर्यंत आहे. पतंगासोबत  लागणारा मांजा आणि चक्री ३०० रुपयांपासून ६०० रुपयांपर्यंत आहे. नायलॉन मांजावर बंदी असल्याने अनेक पतंगविRेत्यांनी यंदा माल भरला नाही. दुसरीकडे बेकायदा नायलॉन मांजा विRी करणाऱ्या दुकानांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली नसल्याने पतंगविक्रेत्यांमध्ये नाराजी आहे.

बाजारपेठ पतंगांनी सजलेली असतांना अद्याप विक्रेत्यांना अपेक्षित अशी विक्री झालेली नाही. बदलते हवामान यास कारणीभूत असले तरी पंतग उडवण्याची आवड दिवसागणिक कमी होत आहे. मुलांना किंवा युवकांना पतंग उडविण्याचा आनंद लुटण्यापेक्षा भ्रमणध्वनी किंवा संगणकात डोके घालणे जास्त आवडते. दुसरीकडे, पालकांकडूनही मुलांना उन्हाचा त्रास नको, अपघात नको अशी कारणे देत पतंग उडविण्यास मज्जाव केला जात असल्याने मुले पतंग उडविणे विसरतात की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. संक्रातीच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेचा रंग उजळेल अशी अपेक्षा पतंग विक्रेते व्यक्त करत आहेत.