शहीद निनाद मांडवगणे यांना नाशिककरांचा भावपूर्ण निरोप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जम्मू-काश्मीर येथील हेलिकॉप्टर अजम्मू-काश्मीर येथील हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले निनाद मांडवगणे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शुक्रवारी येथे अलोट जनसागर लोटला. अंत्ययात्रेत पालकमंत्री गिरीश महाजन, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्यासह हवाई दलाचे अधिकारी, सैनिकांसह नाशिककर उपस्थित होते. श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कानाकोपऱ्यातून सर्वसामान्यांसह महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थी आले होते. देशभक्तीपर गीते आणि ‘शहीद निनाद मांडवगणे अमर रहे’च्या घोषणांनी वातावरण भारावून गेले. निनाद यांच्या दोन वर्षांच्या चिमुकलीने हात जोडून बाबांना अभिवादन केले आणि उपस्थितांना गहिवरून आले. यावेळी अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला.

बुधवारी जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथे हवाई दलाचे एम आय-१७ हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले. त्यात हेलिकॉप्टरचे सारथ्य करणारे स्क्वॉड्रन लीडर निनाद यांचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री विशेष विमानाने निनाद यांचे पार्थिव ओझर विमानतळावर आणण्यात आले. शुक्रवारी सकाळी ते नाशिक-पुणे रस्त्यालगतच्या बँक ऑफ इंडिया कॉलनीतील घरी नेण्यात आले. परिसरातील मोकळ्या मैदानात प्रशासनाने अंतिम दर्शनासाठी व्यवस्था केली होती. कुटुंबीयांनी पार्थिवाचे दर्शन घेतले. निनाद यांच्या पत्नी विजेता या दोन वर्षांच्या चिमुकलीला घेऊन दाखल झाल्या. चिमुकलीने आपल्या बाबांना नमस्कार करत अभिवादन केले. हे दृश्य उपस्थितांना अस्वस्थ करणारे ठरले. अनेकांना गहिवरून आले. या परिसरात सकाळपासून हजारो जण जमले होते. आपल्या सहकाऱ्याला मानवंदना देण्यासाठी हवाई दलाचे अधिकारी, वायू सैनिक एकीकडे तयारी करीत होते. पालकमंत्री गिरीश महाजन, हवाई दलाच्या देवळाली केंद्राचे कमांडोर पी. रमेश, हवाई दलाच्या दुरुस्ती देखभाल केंद्राचे प्रमुख एअर कमांडोर समीर बोराडे, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्यासह अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण केले. महापौर रंजना भानसी. आमदार देवयानी फरांदे, उपमहापौर प्रथमेश गीते आदी उपस्थित होते. लष्करी धून आणि हवेत फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.

 शालेय विद्यार्थ्यांचाही सहभाग

नागरिकांनी अंतिम दर्शन घेतल्यानंतर नाशिक अमरधामपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. तिरंगा हाती घेऊन अनेक शालेय विद्यार्थी सहभागी झाले. देशभक्तीपर गीतांनी वातावरण भावूक झाले होते. कॉलनी, इमारतींमधील रहिवासी वीरपुत्राला निरोप देण्यासाठी रस्त्यावर आले. ‘शहीद निनाद अमर रहे’, ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय ’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पाकिस्तान विरोधातील घोषणांमधून अस्वस्थता अधोरेखित करण्यात आली. अंत्ययात्रा मार्गावरील एकेरी वाहतूक बंद करण्यात आली होती. हजारो नागरिकांनी पायीच अमरधाम गाठले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashikkars emotional message to shaheed ninad mandavgane
First published on: 02-03-2019 at 03:12 IST