पेंच व्याघ्र प्रकल्पातील बफरक्षेत्रांतर्गत येणाऱ्या वाघोली गावात सातपुडा फाऊंडेशनच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी शिबीर आयोजित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील बफरक्षेत्रांतर्गत येणारी व मध्यप्रदेश पेंच व्याघ्र प्रकल्पातील बफरक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या गावांमधील विद्यार्थ्यांचा समावेश होता. महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील तीन जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना सातपुडा फाऊंडेशनने या शिबिराच्या माध्यमातून एकत्र आणले.

घोटी, सावरा, तुरिया, आमझरी, तेलिया, कुंडई, थुयेपानी, बिसनपूर, सावरी, साजपानी या दहा गावातील ३५ विद्यार्थी शिबिरात सहभागी होते. पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील पूर्व पेंचमधील सिल्लारी येथील ‘अमलतास’ या निसर्ग निर्वचन केंद्रात हे शिबीर आयोजित करण्यात आले. निसर्गात वाघाची आणि इतर वन्यप्राण्यांची भूमिका कशी महत्त्वाची आहे, हे एकूणच जीवनचक्र या केंद्रात चित्रातून दाखवण्यात आले आहे. दोन दिवसाच्या या निवासी शिबिरादरम्यान निसर्ग खेळ, वन्यजीव आणि त्यांचे महत्त्व सांगणारी व्याख्याने, वन्यजीवांवरील लघूपट विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. वाघोली गावातील पिपरिया तलावाजवळ, तसेच शिवकुंड क्षेत्राजवळ विद्यार्थ्यांनी निसर्ग भ्रमंतीचा आनंद घेतला.

यावेळी त्यांनी पक्षी निरीक्षण, वनस्पती आणि झाडांची ओळख करून घेतली. विद्यार्थ्यांसाठी याप्रसंगी जंगल सफारीचा आनंद घेतला. यादरम्यान त्यांना रानकुत्रे, कोल्हा, हरीण, सांबर, जंगली घुबड, तसेच विविध प्रकारचे पक्षी पाहिले. संपूर्ण दिवसभर थरारक आणि उत्कंठावर्धक उपक्रमात सहभागी झाल्यानंतर वाघोली येथे ते लोकनृत्य व इतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत होते.

शिबिराच्या समारोपाला सातपुडा फाऊंडेशनचे सहाय्यक संचालक अनुप अवस्थी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वन्यजीव संवर्धनावर त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यावेळी विविध संवर्धन क्रिया विद्यार्थ्यांना त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या पातळीवर समजावून सांगण्यात आल्या. पूर्व पेंचचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए.आर. देवकर यावेळी प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. निसर्ग शिबिरांचा उपयोग वने आणि वन्यजीव संवर्धनासाठी होईल, अशी अपेक्षा सातपुडा फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर रिठे यांनी व्यक्त केली. याप्रसंगी वन्यजीवांसंबंधी सादरीकरण, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातून मुकुंद धुर्वे, अजय पोद्दार, बंडू उईके, दिलीप लांजेवार, निरंजन हिंगे, कमलेश पवार, मुनेंद्र टिकपचे, मंदार पिंगळे यांनी सादर केली. याप्रसंगी विविध पर्यावरण शिक्षण कार्यक्रमसुद्धा सादर करण्यात आले. महाराष्ट्र वनखाते, तसेच वाघोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने या शिबिरासाठी सहकार्य करून महत्त्वाची भूमिका बजावली. सिल्लारी येथील वनपाल केंद्रे यांनी विद्यार्थ्यांना सफारी घडवून आणली. तसेच शाळांच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले.