राजकीय पक्षाचा कार्यक्रम आणि अन्य सामाजिक उपक्रम हे एकाच धाग्यात न बांधण्याच्या सूत्रामुळे खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या आनंदींचा उत्सव या कार्यक्रमापासून राष्ट्रवादीचे बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्त्यांना चार हात दूर राहावे लागल्याचे पाहावयास मिळाले.
नाही म्हणायला, माजी खासदार देवीदास पिंगळे हे व्यासपीठावर अचानक अवतीर्ण होऊन विराजमान झाले. विजयश्री चुंबळे पक्षाच्या असल्या तरी त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा या नात्याने सोहळ्यास निमंत्रित होत्या. पालिकेतील पक्षाच्या गटनेत्या कविता कर्डक यांनी बचत गटाचा संदर्भ देऊन कार्यक्रमास हजेरी लावली.
भुजबळ नॉलेज सिटीची धुरा सांभाळणाऱ्या शेफाली भुजबळ यांनादेखील सोहळ्यास उपस्थितीचे भाग्य लाभले. बोटावर मोजता येतील, असे हे निवडक अपवाद वगळता राष्ट्रवादीचे इतर स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खा. सुळे यांच्या कार्यक्रमापासून दूर राहणेच भाग पडले.
यशस्विनी सामाजिक अभियान, विश्वास बँक, अक्षरा स्त्री संसाधन केंद्र, अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलमेंट आदी संस्थांच्या वतीने शहरातील १५ ते ३५ वयोगटातील युवतींसाठी आनंदींचा उत्सव या कार्यक्रमाचे खा. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. गंगापूर रस्त्यावरील विश्वास लॉन्स येथे हा कार्यक्रम पार पडला. युवतींचा सर्वागीण विकास करण्याच्या उद्देशाने उपरोक्त संस्था एका छताखाली एकत्र आल्या. या कार्यक्रमात तसा राष्ट्रवादीचा थेट संबंध नव्हता. यशस्विनी अभियानाच्या कार्यात खुद्द सुळे यांनी कधी पक्षीय स्वरूप आणलेले नाही. राजकीय पक्षाचा कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम यांची गल्लत न करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांच्या या धोरणाचा परिणाम सोहळ्यातील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीवर झाल्याचे प्रकर्षांने पाहावयास मिळाले. केंद्र आणि राज्यातील सत्ता गेल्यानंतर जमिनीवर आलेले पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलन व इतर माध्यमांतून जनसेवेसाठी धडपड करत आहेत. सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन अथवा तत्सम उपक्रमांस उपस्थिती लावण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, परंतु सुळे यांच्या धोरणामुळे त्यांना या कार्यक्रमास उपस्थित राहता आले नाही.या उपक्रमात युवतींच्या सर्वागीण विकासासाठी शिक्षण, आरोग्य, सबलीकरण, सुरक्षितता या विषयावर भर देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे नेतृत्व करणाऱ्या विजयश्री पिंगळे आणि शिक्षण क्षेत्रातील शेफाली भुजबळ यांना व्यासपीठावर स्थान दिले होते. चुंबळे यांनी मार्गदर्शनही केले.
कार्यक्रम पक्षाचा नव्हता
राष्ट्रवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांना मात्र अलिखित संकेताचे पालन करता आले नाही. कार्यक्रमास सुरुवात झाल्यानंतर काही वेळाने ते अकस्मात व्यासपीठावर दाखल झाले. पिंगळे यांनी खा. सुळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत व्यासपीठावर ठाण मांडले. राष्ट्रवादीचे अर्जुन टिळे यांनी प्रेक्षकांमध्ये बसावे लागले. पिंगळे व टिळे यांचा अपवाद वगळता असा संकेतभंग करण्याचे धाडस कोणी पदाधिकारी वा कार्यकर्ते करू शकले नाहीत. खा. सुळे यांनी पक्षीय कार्यक्रम नसल्याने स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांना निमंत्रित न करणे पसंत केल्याचे पाहावयास मिळाले.