नाशिक : सोमवारी झालेल्या मुसळधार पावसात सराफ बाजार, दहीपूल, हुंडीवाला लेन, शुक्ल गल्ली आणि फुल बाजार आदी परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरून अतोनात नुकसान झाले. या परिसराची पाहणी मंगळवारी दुपारी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. यावेळी पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील आदी उपस्थित होते. १५ ते २० मिनिटांच्या पाहणी दौऱ्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक, कार्यकर्त्यांनी गर्दी केली. करोना काळात सुरक्षित अंतर राखण्याचा अनेकांना विसर पडला. जवळपास ६० ते ७० जण भुजबळांसभोवती गर्दी करून सर्वत्र फिरत होते.
शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दिवसागणिक मोठय़ा संख्येने रुग्ण सापडत आहेत. सोमवारी दिवसभरात शहरात करोनाचे ६५ रुग्ण सापडले. शहरातील एकूण रुग्णसंख्या साडेसातशेच्या घरात पोहचण्याच्या मार्गावर आहे. टाळेबंदीचे र्निबध शिथील झाल्यानंतर करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र आहे.
या एकंदर परिस्थितीत मुखपट्टी लावणे, सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर राखणे या नियमांचे पालन करण्याचे आवाहन महापालिकेसह लोकप्रतिनिधींकडून वारंवार केले जाते. पालकमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी बहुतेकांनी मुखपट्टीचा वापर केला होता. परंतु, सुरक्षित अंतर राखण्याचा नियम पाळला गेला नाही. आदल्या दिवशी पावसामुळे मध्यवर्ती बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. साहित्य, उपकरणे भिजले. दरवर्षी पावसाळ्यात या संकटाला तोंड द्यावे लागते. यावर तोडगा निघत नसल्याने व्यापारी त्रस्तावला आहे. पालकमंत्री येण्याआधीच पालिकेच्या यंत्रणेने फुल विक्रेत्यांना हटविले. परिसराची घाईघाईत स्वच्छता करण्याची धडपड केली. भुजबळ पाहणीसाठी येणार असल्याचे समजल्यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक गजानन शेलार, अन्य पदाधिकारी दहीपूल रस्त्यावर हजर झाले. दीड वाजेच्या सुमारास भुजबळ यांचा ताफा हुंडीवाला लेनच्या चौफुलीवर आला.
भुजबळ यांनी परिसरात फिरून भुयारी गटारी, नाल्याचे चेंबर आणि दहीपूल रस्त्यावरील नुकसानग्रस्त दुकानांचे अवलोकन केले. पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पावसाळापूर्व झालेल्या कामांची माहिती दिली. नगरसेवक शेलार हे देखील भुजळांना सर्व माहिती देत होते. सराफ असोसिएशन, कापड आणि भांडी व्यावसायिक संघटनांचे पदाधिकारी दरवर्षी भेडसावणाऱ्या समस्येवर माहिती देण्यासाठी जमले होते. जवळपास ६० ते ७० जण १५ ते २० मिनिटे या भागात एकत्रित होते. परस्परांपासून सुरक्षित अंतर राखण्याचा अनेकांना विसर पडला. जेव्हां पाहणी दौरा झाला, त्यावेळी बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची वर्दळ होती. काही जणांशी संवाद साधून पालकमंत्र्यांचा ताफा मार्गस्थ झाला.