सुरक्षित वाहतुकीसाठी प्रादेशिक परिवहन विभागाचा प्रस्ताव

नाशिक : करोनाच्या टाळेबंदीत अडकलेले राज्यातील मजूर मिळेल त्या वाहनांनी आपले गाव गाठण्याच्या प्रयत्नात असतांना मजुरांची असुरक्षित वाहतूक सुरक्षित करण्यासाठी मजूर वाहतुकीबाबत नियमावली तयार करण्याची मागणी प्रादेशिक परिवहन विभागाने राज्य शासनाकडे केली आहे.

सद्यस्थितीत या वाहतुकीदरम्यान अपघात झाल्यास विमा संरक्षण मिळत नाही. मजूर उपलब्ध करणारे कंत्राटदार त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत नाहीत. यामुळे मजुरांच्या वाहतुकीला परवाना पध्दती सुरू करावी. तसेच या वाहनांवर वर्षनिहाय प्रति आसन कर आकारणी करावी, असा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी सादर केला आहे.

सध्या मुंबईसह सभोवतालच्या परिसरातून हजारोंच्या संख्येने स्थलांतरीत मिळेल त्या वाहनाने अथवा पायी मार्गस्थ होत आहेत. यासाठी मालमोटार, टेम्पो, कंटेनर, दुचाकी, रिक्षा आदी वाहनांचा आधार घेतला जात आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर सोमवारी सकाळी अशाच मजुरांना घेऊन जाणाऱ्या मालमोटारीच्या अपघातात काही परप्रांतीय मजूर जखमी झाले. कंटेनर, मालमोटारीतून मजुरांची वाहतूक धोकादायक, असुरक्षित असल्याचे उघड झाले.

त्यामुळे अशा मजुरांसाठी योग्य वाहन व्यवस्था निर्माण करणे अािण मोटार वाहन नियमातील तरतुदीत सुधारणा करण्याची गरज  व्यक्त करण्यात येत  आहे.

बैलगाडी, ट्रॅक्टर, जीप, टेम्पो, माल वाहतूक करणारी वाहने अशा वाहनांतून विना परवाना वाहतूक होत आहे. या वाहतुकीदरम्यान अपघात झाल्यास अवैध प्रवासी असल्याने अपघातग्रस्तांना कोणत्याही स्वरुपाचे विमा संरक्षण मिळू शकत नाही. मजूर उपलब्ध करणारे कंत्राटदार, साखर कारखाने, किंवा अन्य उद्योग मजुरांच्या वाहतुकीसाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देत नाहीत. त्यांच्यावर कायद्याने कठोर बंधने नसल्याने पारंपरिक पध्दतीने, अवैधरित्या मजूर वाहतूक करण्याकडे कंत्राटदारांचा कल असतो, याकडे कळसकर यांनी लक्ष वेधले.

प्रति आसन कर आकारणी करावी

शालेय विद्यार्थी वाहतुकीच्या नियमावलीच्या धर्तीवर, राज्यातील मजुरांच्या वाहतुकीबाबत स्वतंत्र परवाना वर्ग आणि त्या अनुषंगाने कर आकारणीबाबत नियमावली तयार करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रथम कामगार आणि मजूर यांची संज्ञा निश्चित करावी लागेल. मजूर वाहतूक करण्यासाठी १२ अधिक एक आणि त्याहून अधिक आसन क्षमता असलेल्या प्रवासी वाहनांचा वापर करणे, मजुरांच्या वाहनास हरित रंग असावा, वाहनात सुरक्षेच्या दृष्टीने रचना, सोयी सुविधा असाव्यात. प्रादेशिक परिवहन विभाग मजूर वाहुतकीस विशिष्ट परवाना वितरित करू शकते या आणि अन्य काही सूचना या प्रस्तावात करण्यात आल्या आहेत.