वृत्तपत्र विक्रेत्यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

नाशिक : वृत्तपत्र विक्रेत्यांना आघाडीवरील सेवक म्हणून जाहीर करावे, अशी मागणी शहरातील चारही वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली. भुजबळ यांनी मागण्यांवर विचार करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. निवेदन देतांना नाशिक शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर धात्रक, नवीन नाशिक सिडको वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष दत्ता ठाकरे, उपाध्यक्ष अजय बागूल, नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष महेश कुलथे, सरचिटणीस भारत माळवे, सातपूर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विनोद कोर तसेच सामाजिक कार्यकर्ते आदित्य धिवर हे उपस्थित होते

मार्च २०२० पासून करोना महामारीचे संकट ठाकले. या संकटातही वृत्तपत्र विक्रेते आपले काम मोठय़ा हिमतीने करीत आहेत. करोनामुळे अनेक वृत्तपत्र विक्रेत्यांचे निधन झाले असंख्य बाधित झाले. असे असूनही वर्तमानपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याने ही अत्यावश्यक सेवा थांबू नये यासाठी योग्य ती  काळजी घेत वृत्तपत्र विक्रेत्यांनी सेवा सुरु ठेवली असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

करोनामुळे निधन झालेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना २५ लाखाची मदत मिळावी, बाधित विक्रेत्यांना तातडीने दोन लाख रुपयांची मदत मिळावी, राज्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांचे तातडीने लसीकरण करावे, वृत्तपत्र विक्रेत्यांची असंघटित कामगार म्हणून नोंदणी करावी, आरोग्य, शैक्षणिक तसेच सेवानिवृत्ती वेतन आदी योजना ताबडतोब लागू कराव्यात, करोनाचे आजारपण व  वैद्यकीय खर्चासाठी आर्थिक मदत मिळावी, आदी मागण्यांचाही निवेदनात करण्यात आल्या आहेत.