चारुशीला कुलकर्णी, लोकसत्ता

नाशिक : शहरातील मनाली बहुउद्देशीय सेवा संस्थेने मानसिकदृष्टय़ा अपंग बालकांच्या उत्थानाचा वसा घेतला आहे. या बालकांच्या शाळेकरिता स्वत:ची इमारत उभारण्यासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी संस्थेने मदतीची साद घातली आहे. मानसिकदृष्टय़ा अपंग बालकांच्या सर्वागीण विकासासाठी कार्यरत मनाली बहुउद्देशीय सेवा संस्थेचा चार मुलांपासून सुरू झालेला प्रवास ५० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. संस्थेकडून पालकांच्या बैठका घेऊन त्यांचे प्रबोधन केले जाते, मुलांच्या प्रगतीविषयी माहिती दिली जाते. संस्था विनाअनुदानित असून संस्थेचा सर्व खर्च मित्र परिवाराकडून मिळणाऱ्या देणगीच्या पैशांतून भागवला जात आहे. पालकांना कोणतीही आर्थिक झळ बसू न देता संस्थेत दाखल होणाऱ्या बालकांचा सर्व खर्च हा संस्थेच्या वतीने करण्यात येत असल्याने कारभार हाकताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

हेही वाचा >>> व्यापारी आक्रमक,सरकार बचावात्मक; बैठकीत पालकमंत्र्यांसमोर वाग्बाण,शुक्रवारी कांदा व्यापाऱ्यांची बैठक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाळेतील बालकांना अक्षरज्ञान, अंकज्ञान, समाजात वावरताना आश्वासक देहबोली, शारीरिक स्वच्छता आदींची माहिती दिली जाते. शाळेत पणत्या, आकाशकंदील, शोभेच्या वस्तू बनवल्या जातात आणि संस्थेला भेट देणाऱ्या मान्यवरांना, मदत करणाऱ्या मित्रपरिवारास भेट म्हणून दिल्या जातात. काही मुलांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केली असून, त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा संस्थेचा मानस आहे. सध्या संस्था भाडेतत्त्वावर छोटय़ा जागेत आहे. त्यामुळे उपक्रम राबविताना मर्यादा येतात. जागा मिळावी, यासाठी संस्थेकडून महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. निधीची जुळवाजुळव झाल्यास बालकांबरोबरच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी चांगली व्यवस्था करणे संस्थेला शक्य होणार आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.