काँग्रेसचे शिष्टमंडळ आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार
तालुक्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची भिस्त असलेल्या दारणा धरणातून सुमारे सव्वा तीन टीएमसी पाणी सोडण्याच्या जलसंपदा विभागाने घेतलेल्या निर्णयास सर्वपक्षीय पदाधिकारी विरोध करणार असल्याची माहिती शिवसेनेचे नेते समाधान वारुंगसे यांनी दिली. या संदर्भात खा. हेमंत गोडसे यांनाही साकडे घालण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, काँग्रेसचे शिष्टमंडळ आ. निर्मला गावित यांच्या नेतृत्वाखाली १९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी सोडण्यास विरोध करणार असल्याची माहिती शेतकरी नेते पांडुरंग शिंदे यांनी दिली. जलसंपदा विभागाने मराठवाडय़ातील जायकवाडी धरणासाठी नाशिक आणि नगर जिल्ह्य़ातील धरणांमधील पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दारणा धरणातूनही पाणी सोडण्यात येणार असल्याने तालुक्यातील जनतेकडून या निर्णयाला विरोध सुरू झाला आहे. मुळात या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने हे धरण अवघे ८७ टक्के भरले. तालुक्यातील इतर धरणांमधील पाणीसाठाही समाधानकारक नसल्याने या धरणातून पाणी सोडून ऑक्टोबरमध्येच धरण निम्मे रिकामे होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जलसंपदा विभागाच्या या एकतर्फी निर्णयास विरोध करण्यासाठी तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांना संघटित करून सर्वपक्षीय लढा उभारणे आवश्यक असल्याचे मत वारुंगसे यांनी मांडले.
याबाबत खा. गोडसे यांच्याशी संपर्क साधला असता, जलसंपदा विभागाने तालुक्यातील दारणा या प्रमुख धरणातून पाणी सोडण्याचा एकतर्फी निर्णय घेतला असून हा निर्णय तालुक्यातील जनतेवर अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांची व तालुक्यातील जनतेची मते जाणून घेत निर्णय घेणे आवश्यक होते. या धरणातून पाणी सोडल्यास भविष्यात तालुक्याला भीषण टंचाईला सामोरे जावे लागेल. जलसंपदा विभागाने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करणे आवश्यक असल्याचे सांगितले. दारणा धरणातून पाणी सोडण्यास काँग्रेसच्या आ. निर्मला गावित यांनीही कडवा विरोध दर्शविला आहे. पाणी सोडल्यास संपूर्ण तालुक्यात टंचाईची समस्या निर्माण होणार असल्याने या निर्णयाला त्यांनी विरोध दर्शविला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No water supply from darna river all parties take decision
First published on: 19-10-2015 at 07:45 IST