पंधरवडय़ानंतर जिल्ह्यतील बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरू झाले असले तरी गोणीबंदच्या अटीमुळे शेतकऱ्यांची अवस्था ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ अशी झाल्याचे दिसत आहे. प्रतवारीनिहाय आणि गोणीबंद कांदाच खरेदी करण्याची अट व्यापाऱ्यांनी घातल्याने लासलगावसह अन्य बाजार समित्यांमध्ये फारसा कांदा विक्रीस आला नाही. आडतमुक्तीचा निर्णय होण्याआधी जिल्ह्यात दररोज एक लाख क्विंटलची आवक होती. बुधवारी शेकडय़ात मर्यादित राहिली. आडतीच्या बोजातून सुटलेला शेतकरी आता या नव्या चक्रात अडकल्याने बहुतेकांनी माल विक्रीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. कांद्याच्या सर्वात मोठय़ा लासलगाव बाजारात या दिवशी सकाळच्या सत्रात केवळ ६०० क्विंटल कांदा विक्रीसाठी आला. नेहमीच्या तुलनेत हे प्रमाणे चार ते पाच टक्केही नाही. इतर बाजार समित्यांमध्ये यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती.
कृषीमाल नियमनमुक्त करताना शासनाने शेतकऱ्यांची आडतीतून मुक्तता करत खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना आडत देण्यास बाध्य केले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कांदा लिलावावर बहिष्कार टाकून आपले परवाने परत केले होते. जवळपास १५ दिवस जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद होते. या संदर्भात बाजार समिती सभापतींनी शासनाकडे दाद मागितली. त्यावेळी पणनमंत्र्यांची समिती प्रत्यक्ष पाहणी करून आपला अहवाल सादर करेल आणि ६ ऑगस्टपर्यंत पुनर्विचार केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. शासनाचा निर्णय होईपर्यंत व्यापाऱ्यांनी राज्यातील अन्य भागात ज्या पद्धतीने गोणीमधील कांद्याचे व्यवहार होतात, त्याच पद्धतीने माल खरेदी करण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार मंगळवारपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लिलाव पूर्ववत झाले. तथापि, या स्वरूपात कांदा आणण्यास शेतकरी तयार नाहीत. गोणीतून कांदा विक्रीसाठी आणणे आर्थिकदृष्टय़ा अधिक खर्चिक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे बाजार समित्यांमध्ये अत्यल्प कांदा विक्रीसाठी आला.
याआधी ट्रॅक्टर वा जीपमधून मोकळ्या स्वरूपात कांदा बाजार समितीत आणला जात होता. एक क्विंटल कांद्यासाठी ३२ रुपये आडत द्यावी लागत होती. परंतु, प्रतवारीनिहाय गोणीत माल आणणे हे त्यापेक्षा अधिक खर्चिक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एक क्विंटल कांद्याची प्रतवारी करणे व गोणीत भरणे यासाठी साधारणत: ७० ते ८० रुपये खर्च येईल. हा खर्च आडतीपेक्षा दुपटीने अधिक असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. सध्याच्या भावाचा विचार करता हा खर्च परवडणारा नसल्याचे त्यांनी नमूद केले.
लासलगाव बाजारात या दिवशी केवळ ६०० क्विंटल कांदा गोणीबंद स्वरूपात विक्रीसाठी आला होता. इतर बाजार समित्यांमध्ये हे प्रमाण तितकेही नव्हते. या स्थितीत कांदा विक्रीला प्रतिसाद मिळणे अवघड असल्याचे बाजार समिती सभापतींनी मान्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संपामुळे बाजार समित्यांचे कोटय़वधींचे नुकसान
व्यापाऱ्यांनी लिलावावर बहिष्कार टाकल्याने जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांमधील कांद्याचे लिलाव बंद पडले. यामुळे बाजार समित्यांना लिलावातून मिळणाऱ्या उत्पन्नावरही विपरीत परिणाम झाला. या काळात समित्यांचे कोटय़वधींचे नुकसान झाले आहे. लासलगाव बाजार समितीला कांदा व इतर कृषीमाल लिलावातून तीन ते चार लाख रुपयांचे दररोज उत्पन्न मिळते. बाजार समिती बंद राहिल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागल्याचे सभापती जयदत्त होळकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या नुकसानीचा हा आकडा कोटय़वधींच्या घरात असल्याचे त्यांनी नमूद केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onion arrivals limited due to goni close condition
First published on: 27-07-2016 at 04:53 IST