लागवडीखालील क्षेत्र घटल्याने चिंता; तुर्तास दरांमध्ये घसरण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनिकेत साठे, लोकसत्ता

नाशिक : उशिराच्या खरीप कांद्याची आवक वाढल्यानंतर उंचावलेले दर कमी होत आहेत. आठवडाभरात प्रति क्विंटल दरात अडीच हजारांनी घसरण झाली. सध्या ते साडेतीन ते चार हजार रुपयांच्या दरम्यान आहे. देशातील इतर भागांतील कांदा बाजारात येण्याच्या मार्गावर असून पुढील काळात ते आणखी कमी होण्याचा अंदाज आहे. सलग दोन-तीन महिने चांगले दर मिळाल्याने शेतकरी उन्हाळ कांद्याच्या लागवडीकडे आकृष्ट झाले. मात्र, त्यांना बियाणे टंचाईला सामोरे जावे लागले. परिणामी, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत रब्बी आणि उन्हाळच्या लागवडीचे क्षेत्र ३० हजार हेक्टरने कमी आहे. ही तफावत भरून न निघाल्यास उन्हाळ कांद्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

आजवरच्या इतिहासात कांद्याने प्रथमच घाऊक बाजारात ११ हजारांचा टप्पा ओलांडून सर्वाचे लक्ष वेधले. अवकाळी पावसात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. उत्पादनात ६० ते ७० टक्के घट आल्यामुळे देशात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला. निर्यातबंदी, परदेशातून आयात, साठवणुकीवर निर्बंध, असे उपाय योजून सरकारने दर नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते निष्फळ ठरले. पावसाने कांद्याचे नियमित चक्र विस्कटले. उन्हाळ्यात चाळीत साठवलेला कांदा दिवाळीपर्यंत बाजाराची गरज भागवतो. याच सुमारास खरीप, नंतर लगेच उशिराच्या खरीपची आवक सुरू होते. उन्हाळ कांदा संपुष्टात येण्याचा काळ आणि खरीप कांद्याचे आगमन यामध्ये जितक्या दिवसांची तफावत पडते, तेवढे दिवस टंचाई निर्माण होऊन दर उंचावतात. यंदा काढणीवर आलेल्या खरीप कांद्याला पावसाचा तडाखा बसला. परिणामी, उशिराच्या खरीपची प्रतीक्षा करावी लागली. ही स्थिती उन्हाळ आणि नव्या लाल कांद्याला विक्रमी भाव मिळवून देणारी ठरली.

एप्रिल, मे २०१९ मध्ये सरासरी ८०० रुपये प्रति क्विंटल असणारा उन्हाळ कांदा सप्टेंबरपासून भाव खाऊ लागला. लासलगाव बाजार समितीत सप्टेंबर, ऑक्टोबर या दोन महिन्यांत सरासरी ३,१०० रुपये, नोव्हेंबरमध्ये उन्हाळला ५१०० तर नव्या लाल कांद्याला ३,८००, डिसेंबरमध्ये लाल कांद्याला ६,९०० इतका सरासरी दर मिळाला होता. नव्या वर्षांत दर साडेतीन हजापर्यंत खाली आला आहे. गुजरातपाठोपाठ मध्यप्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकमधून लवकरच माल येण्यास सुरुवात होईल. तेव्हा दर दोन ते अडीच हजार रुपयांवर येतील, असा अंदाज नाफेडचे माजी उपाध्यक्ष चांगदेवराव होळकर यांनी व्यक्त केला. बियाणे कमी पडले असले तरी उन्हाळची लागवड अजूनही सुरू आहे. बियाणे तयार करण्यासाठी कांदा नाही. या हंगामापेक्षा पुढील वर्षीच्या उन्हाळ कांदा लागवडीत बियाणांअभावी बिकट स्थिती निर्माण होईल, असे होळकर यांनी सांगितले. कृषी विभागाकडील आकडेवारीनुसार सध्या ५८ हजार हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे. गेल्या वर्षी लागवडीचे हे क्षेत्र ८८ हजार ५४५ हेक्टर होते. कमी झालेले लागवडीचे क्षेत्र उत्पादनावर परिणाम करणारे ठरू शकते.

लागवडीतील तफावत

    वर्ष     एकूण वार्षिक लागवड    (खरीप, लेट खरीप, रब्बी / उन्हाळ)             रब्बी / उन्हाळ

२०१८-१९       एक लाख ७२ हजार ४०२ हेक्टर                                                  ८८,५४५ हेक्टर

२०१९-२०       एक लाख ३९ हजार १४५ हेक्टर                                                  ५७,९५१ हेक्टर

कांदा लागवडीच्या सर्व हंगामास महिनाभर उशीर झाला. उन्हाळ कांद्याची लागवड पुढे ढकलली गेली. सध्या रब्बी/उन्हाळ कांदा लागवडीचे क्षेत्र कमी असले तरी पुढील काळात ते वाढणार आहे. गेल्या वर्षी साठवणूक केलेल्या उन्हाळ कांद्याला सर्वसाधारणपणे चांगले दर मिळाले होते. अवकाळी पावसाने रोपांचे नुकसान झाले. नव्याने लागवड करावी लागली. बियाणांचा तुटवडा निर्माण होण्याचे ते कारण आहे. खर्च वाढला तरी शेतकरी उन्हाळ कांद्याची निश्चितपणे लागवड करतील.

– संजीव पडवळ (जिल्हा कृषी अधिकारी, नाशिक)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onion cultivation decreases cause price rise crisis in future zws
First published on: 02-01-2020 at 04:01 IST