नाशिकमधील सायखेडा उपबाजारातील दराने शेतकरी व्यथित

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतकरी आधीच त्रस्त झाला असताना मंगळवारी सायखेडा उपबाजारात कांद्याला केवळ ५ पैसे प्रति किलो म्हणजेच पाच रुपये क्विंटल असा भाव मिळाल्याने खळबळ उडाली आहे. हा कांदा दुसऱ्या प्रतीचा असून त्याला मिळालेला भाव ऐकून संबंधित शेतकऱ्याने तो घरी नेऊन शेतात खत म्हणून फेकणे पसंत केले. दरम्यान, जिल्ह्य़ाातील घाऊक बाजारात महिनाभरात कांदा भावात क्विंटलला २००-३०० रुपयांची घसरण झाली आहे. लासलगाव बाजार समितीत पहिल्या प्रतिच्या कांद्याला या दिवशी ६३० रुपये सरासरी भाव मिळाला.

मंगळवारी पिंपळगाव समितीच्या सायखेडा उपबाजारात वेगळीच घटना घडली. सुधाकर दराडे यांचा पुतण्या मिलिंद हा घरातील १३ क्विंटल कांदा घेऊन बाजारात आला. यापूर्वी त्यांच्या पहिल्या प्रतिच्या कांद्याला ४०० ते – ४५० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. त्यामुळे दुसऱ्या प्रतिच्या कांद्याला किमान २०० रुपये भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, लिलावात त्यास केवळ पाच रुपये क्विंटल भाव पुकारला गेल्याने त्याला जबरदस्त धक्का बसला. १३ क्विंटल कांद्याचे केवळ ६५ रुपये हाती पडणार होते. त्यात उत्पादन खर्च तर दूर, वाहतुकीचा खर्चही वसूल होणार नसल्याने दराडे यांनी तो घरी नेणे पसंत केले. या भावात विक्री करण्यापेक्षा शेतात फेकून खत म्हणून त्याचा उपयोग होईल असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात पहिल्या प्रतिच्या कांद्याला सध्या सरासरी ६०० रुपये भाव मिळत आहे. कांद्याचे भाव गगनाला भिडतात, तेव्हा सरकार तातडीने हस्तक्षेप करते. मात्र भाव रसातळाला जात असताना सरकार त्यात हस्तक्षेप करत नसल्याची तक्रार लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी केली.

उतरण कारण..

साठविलेल्या उन्हाळ कांद्याला हंगामाच्या अखेरीस चांगले भाव मिळतील, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. भाव नाही आणि साठवल्याने वजनातही घट अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडले आहेत. गेल्यावर्षी याच कालावधीत उन्हाळ कांद्याचे भाव अक्षरश: गगनाला भिडलेले होते. या वर्षी विपूल उत्पादनामुळे चार ते पाच महिन्यांपासून ते उतरंडीला लागले आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onion price come down in maharashtra
First published on: 24-08-2016 at 01:31 IST