पालक आणि विद्यार्थ्यांसाठी खास ‘अॅनिमेटेड’ जाहिराती, जिल्हा परिषद शाळांचाही पुढाकार
नाशिक : यंदाच्या शैक्षणिक वर्षांवर करोनाचे सावट असल्याने निर्माण झालेल्या समस्येवर विविध पर्याय शोधले जात आहेत. खासगी शाळांनी ‘ऑनलाईन’ शिकविण्यास सुरूवात केली असतांना महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांनीही त्यांचा कित्ता गिरवणे सुरू केले आहे. शालेय स्तरावर ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवितांना पालक आणि विद्यार्थ्यांसाठी खास ‘कार्टून अॅनिम्ेाटेड’ जाहिराती तयार केल्या आहेत. महापालिकेच्या शाळांमध्ये या माध्यमातून ७०० पेक्षा अधिक पालकांनी विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित केला आहे.
मागील शैक्षणिक वर्षांच्या अंतिम टप्प्यात आलेला करोना अद्याप ठाण मांडुन बसला आहे. याचे वेगवेगळ्या क्षेत्रांवर परिणाम झाले आहेत. शिक्षण क्षेत्राला त्यामुळे वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. प्रशासकीय तसेच आरोग्य विभागाकडून ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत. राज्य सरकारकडून शासकीय नियमावलीचे पालन करत जुलैच्या पहिल्या आठवडय़ात शाळा टप्प्याटप्प्यात सुरू करण्याचा निर्णय झालेला असतांना जिल्ह्य़ातील बहुतांश शाळा ऑनलाइन पध्दतीने सुरू झाल्या आहेत. करोना आणि टाळेबंदीमुळे झालेले स्थलांतर पाहता खासगी शाळांमधील विद्यार्थी संख्येवर परिणाम जाणवत आहे. हे लक्षात घेता कोणाच्या घरी जाण्यास मर्यादा येत असल्याने महापालिका आणि जिल्हा परिषद शाळांसाठी ‘ऑनलाइन’ प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी खास कार्टून अॅनिमेटेड जाहिराती तयार करण्यात आल्या. या जाहिराती पालकांच्या व्हॉट्स अप ग्रुपवर पाठविण्यात आल्या. जिल्हा परिषदेने यासाठी बोली भाषेचा वापर केला आहे. या तंत्राचा फायदा शाळांना झाला असून नाशिक महापालिकेच्या शाळांमध्ये ७१५ पालकांनी ऑनलाइन प्रक्रियेचा अवलंब करत आपल्या पाल्याचा पहिलीच्या वर्गातील प्रवेश निश्चित केला आहे.
खासगी शाळांमध्ये पालकांवर भ्रमणध्वनी, लॅपटॉप किंवा अत्याधुनिक साहित्यांचा वापर करण्यास सांगण्यात आल्याने आर्थिक भरुदड बसत असतांना सरकारी शाळांनी मात्र पालकांवर आर्थिक बोजा पडणार नाही याची काळजी घेतली आहे. महापालिका तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेत ऑनलाइन शिक्षणाचा श्रीगणेशा करतांना किती पालकांकडे अत्याधुनिक भ्रमणध्वनी आहे, नसल्यास ते कुठल्या माध्यमाचा वापर करू शकतात याची माहिती संकलित करण्यात आली. शिक्षकांकडून पालकांसाठी व्हॉट्स अप ग्रुप तयार करून त्या त्या क्रमांकावर लिंक देण्यात आली. विषय आणि वर्गनिहाय लिंक देत असल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार अभ्यास करता येणार आहे. यासाठी सातत्याने मुलांच्या हातात भ्रमणध्वनीची गरज नाही. तसेच दिवसअखेर किती विद्यार्थी यात सहभागी झाले, विषय आकलन किती झाले, याचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. महापालिकेच्या ऑनलाइन शिक्षणास पालक, विद्यार्थी यांचा प्रतिसाद लाभत आहे.
‘सर्वाना शिक्षण हक्क’ प्रवेश प्रक्रिया रखडली
महानगरपालिकेच्या शाळा सुरू झाल्या असून खासगी शाळाही ऑनलाइन पध्दतीने सुरू आहेत. नव्या शैक्षणिक वर्षांचा ऑनलाइन प्रारंभ झाला असतांना यंदाही सर्वाना शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत प्रवेश प्रक्रिया रखडण्याची परंपरा कायम राहिली. पहिली सोडत निघूनही अद्याप प्रवेश प्रक्रिया सुरू न झाल्याने पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. सद्यस्थितीत नाशिक शहरात ४४७ शाळांमध्ये पाच हजार ५५७ विद्यार्थ्यांना सर्वाना शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत प्रवेश घेता येणार आहे. यासाठी १७ हजार ६३० अर्ज आले. त्यापैकी पाच हजार ३०७ विद्यार्थी पात्र ठरले. जूनचा तिसरा आठवडा सुरू होऊनही या संदर्भात प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही.