अ‍ॅप्स, संकेतस्थळ कार्यप्रणालीचा नाशिककरांना फायदा; चार महिन्यांत १० हजारपैकी ९४७७ तक्रारींचे निवारण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पथदीप दुरुस्त करायचा आहे, गटारीचे पाणी वाहत आहे, परिसरात स्वच्छता किंवा पाणी पुरवठा सुरळीत होत नाही, अशा एक ना अनेक तक्रारींसाठी नगरसेवकांसह महापालिका कार्यालयाचे उंबरठे झिजविणाऱ्या नाशिककरांना मागील चार महिन्यात तक्रार निवारण कार्यप्रणाली भ्रमणध्वनी अ‍ॅप आणि संकेतस्थळाने चांगलाच दिलासा मिळाला आहे. महापालिकेच्या कार्यपद्धतीबद्दल सुमारे ५५ टक्के नाशिककरांनी समाधान व्यक्त केले.

सुमारे २० लाख लोकसंख्येच्या नाशिकची धुरा सांभाळणाऱ्या पालिकेतील साडेपाच हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांचे काहीसे सुस्त प्रशासन तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मागील साडेचार महिन्यात अकस्मात कार्यप्रवण झाले आहे. शहरवासीयांसाठी तो सुखद धक्का ठरला. नागरिकांना केंद्रबिंदू मानून मुंढे यांनी वेगवेगळ्या संकल्पना प्रत्यक्षात आणल्या. त्यात तंत्रज्ञानाचा चपखलपणे उपयोग करण्यात आला. तक्रार निवारण कार्यप्रणाली भ्रमणध्वनी अ‍ॅप आणि संकेतस्थळ हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. आपल्या भागातील कोणताही प्रश्न किंवा समस्या सोडविण्यासाठी आजवर नगरसेवक अथवा पालिकेच्या कार्यालयात खेटे मारण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मात्र या प्रणालीने प्रशासनाच्या कामकाजाचा नूर पालटला आहे. तक्रार करण्यासाठी नागरिकांना कोणाकडे जाण्याची गरज भासत नाही. घरबसल्या ऑनलाइन कोणीही थेट तक्रार करू शकतो. प्राप्त होणाऱ्या तक्रारी मुदतीत सोडविण्याचे दायित्व असल्याने संबंधित विभागांचा कामकाजातील हलगर्जीपणा आपसूक दूर झाला आहे.

महापालिकेच्या एकुणच कार्यपध्दतीत झपाटय़ाने सकारात्मक बदल झाले आहे. ऑनलाइन तक्रार करणाऱ्यांपैकी ५४.९२ टक्के नागरिकांनी तक्रारीचे तत्परतेने निराकरण झाल्यामुळे समाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. एका प्रणालीमुळे शहरवासीयांचा महापालिकेकडे बघण्याच्या दृष्टिकोनात बदल झाला आहे. दुसरीकडे या व्यवस्थेमार्फत संपूर्ण प्रशासनाच्या कामावर देखरेख ठेवली जाते. आजवर दाखल झालेल्या तक्रारींमध्ये सर्वाधिक तक्रारी विद्युत विभागाशी संबंधित तर सर्वात कमी तक्रारी विविध कर विभागाशी संबंधित आहेत. ऑनलाईन व्यवस्थेबरोबर ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमाद्वारे नागरिकांना थेट आयुक्तांसमोर तक्रारी मांडता येतात. या उपक्रमातून अतिक्रमण विभाग, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, बांधकाम, आरोग्य, उद्यान विभाग आदी विभागांशी निगडित प्रश्न तक्रार केल्यावर लगेचच मार्गी लागत असल्याने शहरवासीयांना सुखद धक्का बसला आहे.

आयुक्तांकडून तक्रारींचा आढावा

चार महिन्यात आजवर दाखल झालेल्या १० हजार ९९ तक्रारींपैकी ९३.८४ टक्के म्हणजे ९४७७ तक्रारींचे तत्परतेने निराकरण झाल्यामुळे नागरिक सुखावले आहेत. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत केवळ ६२२ तक्रारी प्रलंबित आहे. त्यावर संबंधित विभागांमार्फत निराकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. सात दिवस आणि ३० दिवसांच्या कालावधीत प्रलंबित असलेल्या तक्रारींची संख्या केवळ १०७ आहे.  ‘एनएमसी इ कनेक्ट अ‍ॅप’ आणि संकेतस्थळ या तक्रार निवारण कार्यप्रणालीत साधारणत: ७० ते १०० दरम्यान तक्रारी प्राप्त होतात. दर सप्ताहात दाखल होणाऱ्या आणि निराकरण झालेल्या तक्रारींचा आढावा खुद्द आयुक्त मुंढेमार्फत घेतला जातो.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online grievance redressal system
First published on: 20-06-2018 at 01:00 IST