बदलत्या काळाबरोबर गुन्हेगारीची पद्धतही बदलत असून बडे सावज हेरून जाळ्यात अडकवायचे आणि नंतर त्या मोबदल्यात रक्कम उकळायची, असे काही प्रकार घडत असूनही नाहक बदनामी नको या भावनेतून फसविले गेलेले घटक पोलिसांकडेही दाद मागत नसल्याचे चित्र आहे. इंटरनेट, स्मार्ट फोन या आधुनिक साधनांच्या साहाय्याने कोणाशी सहजपणे संपर्क साधणे दृष्टिपथास आले. त्याचा कौशल्याने वापर करत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटकांनी सावजाला लग्नाच्या बेडीत अडकवून अथवा ब्लॅकमेलिंग करण्यापर्यंत मजल गाठली आहे. गंभीर बाब म्हणजे, सावजाला अडकविण्यासाठी या गटांना महिला व युवतींचे सक्रिय साहाय्य लाभते. संबंधितांच्या अमिषाला बळी न पडणे हाच त्यावर उपाय असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मागील आठवडय़ात येवला शहरातील दोन युवकांचे ३० लाखाच्या खंडणीसाठी अपहरण झाले होते. पोलिसांच्या अथक प्रयत्नांतून त्यांची सही सलामत सुटका झाली. या प्रकरणात तीन महिला व युवतींसह एकूण १३ जणांना पोलिसांनी अटक केली. संशयितांकडून गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे व इतर काही हत्यारे हस्तगत करण्यात आली. झटपट श्रीमंत होण्यासाठी गुन्हेगार चोरी, दरोडे, लुटमार, सोनसाखळी खेचून असे अगणिक गुन्हे करत असतात. बदलत्या काळात त्यातील काही घटकांनी फसवणुकीसाठी वेगळे तंत्र आत्मसात केल्याचे दिसून येते. इंटरनेट व समाज माध्यम या साधनांचा त्यांच्याकडून खुबीने वापर केला जातो. ग्रामीण व शहरी भागात धनाढय़ वा बडय़ा घरच्या युवकांना फसविण्यावर गुन्हेगारांनी लक्ष केंद्रित केले आहे. संबंधितांच्या आवडी निवडीचा अभ्यास करून त्यांना छायाचित्राद्वारे आकर्षित केले जाते. संबंधित युवक एकदा जाळ्यात अडकला की, त्यास ब्लॅकमेल करून पैसा उकळला जातो.
नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे गतकाळात दीपक शेळके याने अनधिकृतपणे वधू-वर सूचक केंद्राची स्थापना केली होती. मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असल्याने अनेक समाजात वधू मिळणे अवघड झाले आहे.
त्यातील काही समाज आर्थिकदृष्टय़ा सधन आहेत. या समाजात वधू मिळण्यातील अडचणी लक्षात घेऊन काही संशयितांनी त्याकडे लक्ष केंद्रित केले. गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित युवतींनी लग्न करून अनेकांना फसविल्याचे सांगितले जाते. फारशी चौकशी न करता लग्न सोहळा अतिशय थाटामाटात पार पडतो. लग्न झाल्यावर टोळीतील महिला घरातील मंडळींचे सोने-नाणे घेऊन पसार होते. प्रसंगी कायद्याच्या आधार घेऊन पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध छळवणुकीची तक्रार केली जाते.
श्रीरामपूर येथील उपरोक्त वधू-वर सूचक केंद्रात असेच काही प्रकार घडून अनेकांना फसविले गेल्याची चर्चा आहे. अशाच प्रकरणात शेळके व आम्रपालीबाईवर ठपका ठेवण्यात आला होता. त्या प्रकरणात शेळके आजही गजाआड आहे. त्यांच्याशी अपहरण प्रकरणात अटक झालेली पूजा पंकज जैन (२३) संबंधित होती.
हीच संशयित दुसऱ्या संशयिताबरोबर राहते अशी माहिती पुढे आली आहे. या पूजाचा राजस्थानमधील पंकज जैनबरोबर विवाह झाल्यानंतर ती श्रीरामपूरमध्ये वास्तव्यास आली. सध्या हे १३ आरोपी अटकेत असल्याने त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना तुर्तास लगाम लागला आहे.
युवतींच्या गोड आवाजात धनाढय़ युवकांना अथवा रॅकेटद्वारे लग्न लावून फसविण्याचे काही प्रकार आसपास घडत असले तरी संबंधित कुटुंबे तक्रार देण्यास पुढे येत नाही. यामुळे गुन्हेगारांचे फावत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे मत आहे.
गुन्हेगार नेहमी नव्या पद्धती शोधत असतात. तरुण मुलींचा वापर करून छायाचित्र पाठवत, मीत भाषेत संवाद साधून आकर्षित केले जाते. या प्रक्रियेत मौजमजा करणाऱ्या धनाढय़ युवकांची निवड करून टोळी सापळा रचते. हॉटेलच्या खोलीत संबंधिताचे चित्रीकरण केले जाते. त्यानंतर या सर्वाचा वापर ब्लॅकमेलिंग करण्यासाठी केला जातो. दुसऱ्या प्रकारात गरजू धनाढय़ घर शोधून लग्नही लावले जाते. लग्नानंतर संबंधित महिला घरातील सोने-नाणे घेऊन पलायन करते. लग्नात फसलेली सज्जन व्यक्ती पोलीस ठाण्यात तक्रार देणे टाळते. येथेच त्यांची चूक होते आणि संशयितांना पुन्हा असे गुन्हे करण्याची संधी मिळते. कोणीही अशा अमिषाला बळी पडू नये
वरिष्ठ पोलीस अधिकारी, नाशिक ग्रामीण पोलीस