या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोणी पद्धतीच्या कांदा लिलावास विरोध दर्शवीत बुधवारी कळवण शहरातील मुख्य रस्त्यावर शेतकरी व सर्वपक्षीय नेत्यांनी दोन तास रास्ता रोको करीत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात असमर्थ ठरलेल्या बाजार समितींचे संचालक मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या आंदोलनाचा फटका शालेय विद्यार्थी व नागरिकांना सहन करावा लागला.

सकाळी अकरा वाजता कळवण बाजार समितीच्या आवारापासून मोर्चा काढत सर्वपक्षीय पदाधिकारी व शेतकरी बस स्थानक परिसरात आले. आमदार जिवा पांडू गावित उपस्थित होते. अडतमुक्तीचा निर्णय झाल्यापासून १६ दिवसांपासून व्यापाऱ्यांनी आडमुठे धोरण अवलंबीत बाजार समितीचे लिलाव बंद पाडले आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पाऊस सुरू असल्याने चाळीत साठवलेला कांदा खराब होत आहे. त्यास दरही कमी असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. या वेळी संतप्त शेतकऱ्यांनी बसस्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी प्रचलित पद्धतीने ट्रॅक्टरमध्ये मोकळा कांदा विक्रीसाठी आणावा, असे आवाहन शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख कारभारी आहेर यांनी केले. या आंदोलनात दीड हजार शेतकरी सहभागी झाले. तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले. आ. गावित यांनी व्यापारी, बाजार समिती व सरकार यांच्या असमन्वयामुळे शेतकरी भरडला जात असल्याचा आरोप केला. कांदा नाशवंत पीक असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून हा प्रश्न विधानसभेत मांडला जाईल, असे त्यांनी सांगितले. बाजार समितीचे सभापती धनंजय पवार यांनी बाजार समितीतील लिलाव बंद हे शासनाच्या निर्णयाविरोधात व्यापारीवर्गाने पुकारलेले बंड असल्याचे सांगितले. बाजार समितीच्या संचालक मंडळाने राजीनामा देऊन बाजार समितीतील लिलाव पूर्ववत होणार असतील तर आम्ही संचालक राजीनामा देण्यास तयार असल्याचे त्यांनी सूचित केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposing to methods of auction of onion
First published on: 28-07-2016 at 01:25 IST